ज्योतिरादित्य शिंदेंना थेट लढत देणार राहुल गांधी?, मैत्री ते राजकीय वैर...राजकारणाचे बदलते रंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 07:04 PM2023-04-06T19:04:21+5:302023-04-06T19:05:03+5:30

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे एकेकाळी जवळचे मित्र होते.

jyotiraditya scindia and rahul gandhi may be face to face in coming mp assembly election | ज्योतिरादित्य शिंदेंना थेट लढत देणार राहुल गांधी?, मैत्री ते राजकीय वैर...राजकारणाचे बदलते रंग!

ज्योतिरादित्य शिंदेंना थेट लढत देणार राहुल गांधी?, मैत्री ते राजकीय वैर...राजकारणाचे बदलते रंग!

googlenewsNext

भोपाळ- 

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे एकेकाळी जवळचे मित्र होते. इतके की काँग्रेसमध्ये असताना शिंदे हे राहुल यांच्या कोअर टीमचे महत्त्वाचे सदस्य होते. प्रियांका गांधीही त्यांना आपल्या भावाप्रमाणेच मानत होत्या. दोन पिढ्यांपासून दोन्ही कुटुंबातील ही मैत्री सुरू होती. शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे आणि राहुल गांधींचे वडील राजीव गांधी यांच्यातही घट्ट मैत्री होती. त्यानंतर मार्च २०२० साली ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या तीन वर्षांत राजकारणानं असं वळण घेतलं आहे की आता या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राहुल आणि ज्योतिरादित्य यांच्यात आमने-सामने लढत पाहायला मिळणार आहे.

राहुल गांधींचा ज्योतिरादित्य यांच्यावर हल्ला
तीन वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेल्यानंतरही, ज्योतिरादित्य यांनी गांधी कुटुंबावर थेट हल्ला करणं टाळलं. राहुल यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता ते काँग्रेसचा अंतर्गत मुद्दा म्हणून खोडून काढायचे, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. याचेच उदाहरण म्हणजे बुधवारी ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत राहुल यांच्यावर थेट हल्ला चढवला. राहुल यांना स्वार्थी राजकारणी म्हणण्याबरोबरच त्यांनी काँग्रेसच्या विचारसरणीला देशद्रोही असल्याचं म्हटलं.

भाजपाच्या रणनितीचा प्रमुख दुवा आहेत ज्योतिरादित्य शिंदे
राहुल यांच्याबाबत ज्योतिरादित्य यांच्या आक्रमक भूमिकेचा संबंध या वर्षी मध्यप्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीशी आहे. राज्यात सत्ताविरोधी लढा देत असलेल्या भाजपला यंदाची लढत चुरशीची होणार असल्याची कल्पना आहे. समाजातील अनेक घटकांमध्ये विशेषत: तरुण वर्गात भाजपा सरकारबद्दल नाराजी आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेशात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला मिळालेल्या पाठिंब्यामुळे भाजपाही अस्वस्थ आहे. तरुणांच्या व्होट बँकेचा मोठा भाग काँग्रेसच्या बाजूने जाण्याची भीती आहे. हे पाहता भाजपा ज्योतिरादित्य यांचा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात वापर करू शकते.

राहुल यांच्या विरुद्ध ज्योतिरादित्य उभे ठाकणार?
तीन राज्यांत मोडकळीस आलेली काँग्रेस पुन्हा मध्यप्रदेशात सत्तेत येण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, यात शंका नाही. निवडणूक प्रचारात राहुल गांधी महत्त्वाची भूमिका बजावणार हेही जवळपास निश्चित झाले आहे. मध्य प्रदेशात राहुल गांधींना टक्कर देण्यासाठी भाजपाकडे तरुण चेहरा नाही. दुसरीकडे, तरुणांमध्ये ज्योतिरादित्य यांची लोकप्रियताही सर्वश्रुत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या चांगल्या कामगिरीचे श्रेयही मुख्यत्वे ज्योतिरादित्य यांनाच दिलं गेलं. १५ महिन्यांनंतर ते काँग्रेस सरकार पडण्याचे कारणही ठरले होते. अशा स्थितीत राहुलला टक्कर देण्यासाठी भाजपाकडून ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.

ज्योतिरादित्यांसमोर बालेकिल्ला वाचवण्याचे आव्हान
विधानसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतलेल्या काँग्रेसचे सर्वाधिक लक्ष ज्योतिरादित्य यांचा बालेकिल्ला असलेल्या ग्वाल्हेर-चंबळ प्रदेशावर आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह या क्षेत्रात सातत्याने सक्रिय आहेत. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ हेही या भागाला सतत भेट देत आहेत. काँग्रेसची संपूर्ण रणनीती शिंदे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभूत करण्याची आहे. जेणेकरून त्यांच्याकडून बदला घेतला जाऊ शकेल. अशा परिस्थितीत ज्योतिरादित्य यांच्यासमोर आपला बालेकिल्ला वाचवण्याचं आव्हान आहे. इच्छा असूनही ते या लढ्यापासून दूर राहू शकत नाहीत, अन्यथा त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. काँग्रेसशी मुकाबला करायचा असेल तर त्यांना स्वत:लाच पुढाकार घ्यावा लागेल आणि आपल्या जुन्या मित्राला सामोरं जाणं ही त्यांची मजबुरी असेल. त्यांची बुधवारी नवी दिल्लीत होणारी पत्रकार परिषद कदाचित या तयारीतील पहिली पायरी असू शकते.

Web Title: jyotiraditya scindia and rahul gandhi may be face to face in coming mp assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.