भोपाळ गाठण्यापूर्वीच ज्योतिरादित्य शिंदेंना विरोध; अज्ञात लोकांनी पोस्टर फाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 11:39 AM2020-03-12T11:39:20+5:302020-03-12T11:46:34+5:30
शिंदे हे आज दुपारी तीनच्या सुमारास भोपाळला पोहचतील, येथून त्यांचा ताफा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पोहोचेल.
नवी दिल्ली: मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थित भाजपामध्ये प्रवेश केला. दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. तर शिंदे यांचा भोपाळमध्ये आज जोरदार स्वागत केले जाणार असून भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ठीक-ठिकाणी होर्डींग लावण्यात आले आहे. मात्र याच होर्डींगवर अज्ञात लोकांकडून शाई फेक करण्यात आली असून, लावण्यात आलेले पोस्टर सुद्धा फाडण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यापासून मध्य प्रदेशात सुरू असलेला सत्तासंघर्षला बुधवारी पूर्णविराम मिळालं. तसेच भाजपचं ऑपरेशन लोटस सुद्धा यशस्वी होताना पहायला मिळाले. काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठवून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मध्य प्रदेशमधील भाजपला बळ मिळाले असून, आज शिंदे यांचे भोपाळमध्ये जोरदार स्वागत केले जाणार आहे.
शिंदे हे आज दुपारी तीनच्या सुमारास भोपाळला पोहचतील, येथून त्यांचा ताफा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पोहोचेल. या वेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते हजर असतील. तर शिंदे यांच्या स्वागतासाठी ठीक-ठिकाणी पोस्टर लावण्यात आली आहे. मात्र काही लोकांनी भोपाळच्या पॉलिटेक्निक चौकात लावण्यात आलेले पोस्टर फाडले असून, त्यावर शाईफेक सुद्धा केली आहे. त्यामुळे भोपाळमध्ये परतण्यापूर्वीच शिंदे यांना विरोध होताना पहायला मिळत आहे.
Madhya Pradesh: Ink thrown on the picture of BJP leader #JyotiradityaScindia on a poster put up near Polytechnic Chouraha in Bhopal and a part of the poster torn. He is arriving in Bhopal today. pic.twitter.com/iBQYCh7vF2
— ANI (@ANI) March 12, 2020
भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ सरकारवर निशाणा साधला. शिंदे म्हणाले की, 2018 मध्ये जे आश्वासने देऊन सरकार स्थापन केले गेले ते पूर्ण झाले नाही. तर काँग्रेसमध्ये आता नवीन नेतृत्व स्वीकारले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.