ज्योतिरादित्य शिंदेंचं मोठं पाऊल, ८ नव्या हवाईमार्गांना मंजुरी; राज्यातील दोन मोठ्या शहरांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 05:13 PM2021-07-11T17:13:24+5:302021-07-11T17:14:39+5:30
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंत्रिपदाचा कारभार हाती घेताच मध्य प्रदेशातील नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे.
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंत्रिपदाचा कारभार हाती घेताच मध्य प्रदेशातील नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. छोट्या शहरांना हवाई मार्गानं जोडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या UDAN योजनेअंतर्गत ८ नव्या हवाईमार्गांची घोषणा ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली आहे. हे सर्व हवाईमार्ग मध्य प्रदेशातील शहरांना इतर राज्यांशी जोडणारे आहेत. येत्या १६ जुलैपासून नव्या मार्गांवर विमान प्रवास सुरू होणार आहे.
ग्वाल्हेर-अहमदाबाद, सूरत-जबलपूर, ग्वाल्हेर-पुणे, ग्वाल्हेर-मुंबई या नव्या हवाईमार्गांचा यात समावेश आहे. हवाई प्रवास स्वस्त करणं आणि देशातील कानाकोपऱ्यातील शहरांना हवाई मार्गांनी जोडण्यासाठी UDAN ही योजना सुरू करण्यात आली होती. यात ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशमधील नागरिकांना दिलासा देत नव्या मार्गांची घोषणा त्यांच्या ट्विटर हँडलवरुन केली आहे.
Good news for Madhya Pradesh! Starting 8 new flights from July 16 onwards via @flyspicejet
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) July 11, 2021
- Gwalior-Mumbai-Gwalior
- Gwalior-Pune-Gwalior
- Jabalpur-Surat-Jabalpur
- Ahmedabad-Gwalior-Ahmedabad@MoCA_GoI & the aviation industry are committed to take #UDAN to greater heights!
मध्य प्रदेशातील शहरांना जोडणाऱ्या हवाई मार्गांचा समावेश यात असला तरी महाराष्ट्रातील दोन मोठ्या शहरांच्या विमानतळांचा यात समावेश आहे. मुंबई आणि पुण्याहून आता नागरिकांना थेट ग्वाल्हेरला जाता येणार आहे.
पर्यटनाला चालना मिळणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची UDAN ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. जून २०१६ मध्ये या योजनेचा शुभारंभ झाला होता. या योजनेअंतर्गत सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा तिकीट दरात प्रवास उपलब्ध करुन देण्याचं उद्दीष्ट सरकार समोर आहे. नव्या हवाई मार्गांमुळे देशातील पर्यटनाला देखील चालना मिळते. त्यामुळे देशातील पर्यटन स्थळं विविध शहारांशी हवाई मार्गांनी जोडली जावीत असाही उद्देश केंद्र सरकारचा आहे.