Jyotiraditya Scindia: ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये नाराज? काँग्रेसच्या भारत जोडोचे केले स्वागत; नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 09:02 PM2022-11-24T21:02:25+5:302022-11-24T21:03:48+5:30
शिंदे यांनी मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे कमलनाथ सरकार उलथवून लावत २०२० मध्ये भाजपात प्रवेश केला होता. केंद्रात मंत्रीही झाले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये गेली आहे. महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. तो शमत नाही तोच, राहुल यांचे एकेकाळचे सर्वात जवळचे मित्र आणि नंतर भाजपात गेलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलेले स्वागत चर्चेचा विषय ठरले आहे.
भारत जोडो यात्रा बुधवारी मध्यप्रदेशमध्ये प्रवेश करती झाली. यावेळी शिंदे यांनी या संदर्भात मध्य प्रदेशमध्ये सर्वांचे स्वागत असे वक्तव्य केले होते. यामागे कोणता संदेश आहे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 'भारत जोडो यात्रे'चे 'स्वागत' करण्याबाबत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची टिप्पणी हे त्यांच्या 'घर वापसी'चे संकेत असू शकतात असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने म्हटले आहे.
शिंदे यांनी मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे कमलनाथ सरकार उलथवून लावत २०२० मध्ये भाजपात प्रवेश केला होता. शिंदे यांच्या वक्तव्यावर हिमाचल प्रदेश काँग्रेस कमिटीचे (एचपीसीसी) माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रवक्ते कुलदीप सिंग राठोड म्हणाले, "हे घरवापसीचे लक्षण असू शकते." हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान हे परिवर्तनाचे लक्षण असून जनता भाजप सरकारवर नाराज असल्याचे राठोड यांनी म्हटले. हिमाचल प्रदेशात काँग्रेस स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करेल, असा दावा त्यांनी केला.
गेल्या वर्षी तीन विधानसभा आणि एका लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने काँग्रेसने राज्यातील महागाई आणि कुशासनाचा मुद्दा उपस्थित केला होता. आमदारांच्या घोडेबाजारावर राठोड म्हणाले की, हे शक्य आहे. आमच्या सदस्यांच्या निष्ठेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, मुख्यमंत्री पदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे ते म्हणाले.