मध्यप्रदेशातील प्रचारामध्ये ज्योतिरादित्य सिंदिया, सचिन पायलट आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 04:35 AM2020-10-29T04:35:15+5:302020-10-29T04:35:26+5:30

Madhya Pradesh by poll : मध्य प्रदेशात पोटनिवडणुका होत असलेल्या विधानसभा जागांपैकी १६ जागा या ग्वाल्हेर-चंबळ परिसरात आहेत. ग्वाल्हेर हा ज्योतिरादित्य सिंदिया यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे त्या परिसरातील भाजपला मोठा विजय मिळवून देण्याची कामगिरी त्यांना पार पाडावी लागणार आहे.

Jyotiraditya Scindia, Sachin Pilot face to face in the campaign in Madhya Pradesh | मध्यप्रदेशातील प्रचारामध्ये ज्योतिरादित्य सिंदिया, सचिन पायलट आमनेसामने

मध्यप्रदेशातील प्रचारामध्ये ज्योतिरादित्य सिंदिया, सचिन पायलट आमनेसामने

Next

भोपाळ - मध्यप्रदेश विधानसभेच्या २८ जागांसाठी ३ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकांत प्रचारामध्ये ज्योतिरादित्य सिंदिया व सचिन पायलट हे दोन युवा नेते समोरासमोर उभे ठाकणार आहेत. ज्योतिरादित्य यांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला, तर नाराज सचिन पायलट यांनी काँग्रेसमध्ये राहणे पसंत केले होते. त्यामुळे हे दोन नेते निवडणूक प्रचारात एकमेकांवर काय आरोप करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोटनिवडणुका होत असलेल्या विधानसभा जागांपैकी १६ जागा या ग्वाल्हेर-चंबळ परिसरात आहेत. ग्वाल्हेर हा ज्योतिरादित्य सिंदिया यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे त्या परिसरातील भाजपला मोठा विजय मिळवून देण्याची कामगिरी त्यांना पार पाडावी लागणार आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आपले सरकार टिकवून ठेवण्यासाठी भाजपचे आणखी ८ आमदार निवडून आणणे आवश्यक आहे. 

काँग्रेसने जर विधानसभेच्या सर्व २८ जागा जिंकल्या, तर त्या पक्षाचे सरकार पुन्हा मध्यप्रदेशमध्ये स्थापन होऊ शकते. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून राजस्थानातील  नेते सचिन पायलट यांच्यावर  मोठी कामगिरी पक्षाने सोपविली  आहे.

काँग्रेसमध्ये असताना ज्योतिरादित्य सिंदिया व सचिन पायलट यांची घनिष्ठ मैत्री होती. राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले होते; पण सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर पायलट यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता. 

Web Title: Jyotiraditya Scindia, Sachin Pilot face to face in the campaign in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.