नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारनं ऑपरेशन गंगाची (Operation Ganga) सुरुवात केली आहे. आता ही मोहीम अधिक जलदगतीनं राबवण्यासाटी मोदी सरकारमधील चार मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये पोहोचण्याची जबाबदारी दिली आहे. त्यापैकी, नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे रोमानियाच्या बुखारेस्ट येथे पोहोचले असून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे मराठमोळ्या विद्यार्थ्यांशी मराठी संवाद साधून धीर दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, त्या ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाण्याची योजना ठरली. हे चारही मंत्री विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी समन्वय साधण्याचं काम पार पाडत आहे. ज्योतिरादित्य शिंदे हे बुखारेस्टला पोहोचले असून त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांची आस्थेने विचारपूस केली. येथे, त्यांना पुणे आणि सांगलीतील विद्यार्थीनीही भेटल्या.
तसेच चंद्रपूरमधील एका विद्यार्थ्याने मी महाराष्ट्राचा असल्याचे सांगताच, मग मराठीतून बोलणारे बाबा... असे म्हणत त्याच्याशी मराठीतून संवाद साधला. तसेच, कुठल्या जिल्ह्यातून आला हेही विचारपूस केली. तसेच, काळजी करू नका, भारत सरकार तुमच्यासोबत आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वासही दिला.
या 4 मंत्र्यांवर जबाबदारी
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रिजिजू आणि जनरल व्ही.के.सिंह हे युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी समन्वय कार्यासाठी हजर आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारीही आपात्कालीन बैठक बोलावली होती. यादरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि विदेश सचिव हर्षवर्धन श्रृंगला उपस्थित होते. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढणं हे आपलं प्राधान्य असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं.