नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार ज्योतिरादित्य सिंधिया आक्रमक झाले असून त्यांनी पक्षाविरुद्धच रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मध्ये प्रदेशात काँग्रेसमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. वचन पत्रातील आश्वासनांच्या पूर्ततेसाठी सिंधिया यांनी पक्षाला धारेवर धरले आहे.
काँग्रेस पक्षाने ज्या मुद्दांवर आणि आश्वासनांवर सत्ता मिळवली, ती आश्वासने पूर्ण करावी. अन्यथा आपण रस्त्यावर उतरू असं सिंधिया म्हणाले आहे. मी जनतेचा सेवक आहे. जनतेच्या प्रश्नांवर लढणे माझा धर्म आहे. त्यासाठी थोडा धीर धरावा लागेल. ज्या आश्वासनांवर आम्ही सत्तेवर आलो आहोत, ती पूर्ण करावी लागणार आहे. पण तसं न झाल्यास रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा सिंधिया यांनी दिला.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि सिंधिया यांच्यातील मतभेद दिवसेंदिवास वाढत आहेत. शेतकरी कर्जमाफी आणि गेस्ट शिक्षकांच्या मुद्दांवर दोघे आमने-सामने आले होते. त्यावेळी देखील त्यांनी रस्त्यावर उतरण्याचे वक्तव्य केले होते.
दरम्यान कॅबिनेटमंत्री गोविंद सिंह यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने रस्त्यावर उतरण्याची भाषा करणे योग्य नसल्याचे म्हटले. तसेच ज्यांना रस्त्यावर उतरायच त्यांनी खुशाल उतरावे, सरकार जनतेला दिलेले आश्वासने पाच वर्षांत पूर्ण करणार आहे. त्यासाठी एक वर्षाचा कालावधी ठरवण्यात आलेला नाही, असा टोला त्यांनी सिंधिया यांना लगावला आहे.