नवी दिल्ली - काँग्रेसचे मातब्बर नेते असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज पक्षाला रामराम ठोकला. दरम्यान, शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर त्यांचा भाजपा प्रवेश हा केवळ औपचारिकता मानला जात आहे. मात्र ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजपा प्रवेशाचा आजचा मुहूर्त टळला आहे. आता ज्योतिरादित्य शिंदे हे १२ किंवा १३ मार्च रोजी भाजपात अधिकृतरीत्या प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या भावी वाटचालीबाबतच्या निर्णयाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. त्यातच शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजपा प्रवेशाची केवळ औपराचिकता शिल्लक राहिली आहे. पण आज शिंदे यांचा भाजपात प्रवेश होऊ शकला नाही. दरम्यान, शिंदे हे बुधवारी कमळ हाती घेतील, असे वृत्त आले होते. मात्र ज्योतिरादित्य शिंदेंचा भाजपा प्रवेश हा १२ किंवा १३ मार्चला होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
त्यानंतर शिंदे हे दिल्लीतून ग्वाल्हेरला जातील. तेथून ते भोपळला रवावा होतील. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडल्याने मध्य प्रदेशमधील राजकारणात भूकंप झाला आहे. त्यांचे समर्थक असलेल्या अनेक आमदारांनी राजीनामे दिल्याने राज्यात सत्तेवर असलेले कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे.
संबंधित बातम्या
'बंडखोरी'ला मोठा इतिहास; ज्योतिरादित्यांच्या आजीनेही काँग्रेस सरकार पाडलेले
राजीनामा नाही, काँग्रेसने हकालपट्टी केली; ज्योतिरादित्यांवर ठेवला गंभीर आरोप
...म्हणून आजचा दिवस ज्योतिरादित्य सिंधियांसाठी खास; लवकरच धरणार भाजपचा 'हात'
आणीबाणीने कुटुंब फोडलेले, ज्योतिरादित्य सिंधिया आज जोडणार; राजमातेचे स्वप्न पूर्ण करणार
मात्र असे असले तरी राज्यातील सरकार टिकवण्याबाबत काँग्रेस अद्यापही आशावादी आहे. अनेक आमदारांनी बंडखोरी केली असली तरी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मास्टरस्ट्रोक अद्यापही कायम आहे, त्याच्या जोरावर राज्यातील सरकार वाचवण्यात यश येईल अशा विश्वास काँग्रेसला आहे. याबाबत काँग्रेसचे नेते पी सी शर्मा म्हणाले की, ‘निश्चितपणे एक नवी माहिती तुमच्यासमोर येईल. संध्याकाळपर्यंत तुम्हाला कमलनाथ यांचा मास्ट्ररस्ट्रोक पाहायला मिळेल.’
पी सी शर्मा यांच्या या वक्तव्यानंतर सरकार टिकवण्यासाठी काँग्रेस कुठला मास्टरस्ट्रोक खेळू शकते याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचे राजीनामे घेऊन काही नाराज आमदारांना मंत्रिपद देऊन त्यांना पक्षात परत आणण्याची खेळी खेळण्याची तयारी कमलनाथ यांनी केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कमलनाथ हे आपल्या काही निकटवर्तीय नेत्यांच्या माध्यमातून काही बंडखोर आमदारांच्या संपर्कात आहेत. तसेच त्या माध्यमातून वाटाघाटी होत आहेत, असे सांगण्यात येत आहे.