भोपाळ : गेल्या 15 वर्षांपासूनचे भाजपाचे सरकार उलथवून काँग्रेसने काठावर बहुमत मिळवत मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली होती. मात्र, कमलनाथ यांचे सरकार अल्पायुषी ठरताना दिसत आहे. कारण काँग्रेसचे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बंडखोरी केली असून 6 मंत्र्यांसह 17 आमदारांना कर्नाटकात नेऊन ठेवले आहे. तर सिंधिया गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मोदींना भेटून नुकतेच बाहेर पडले आहेत. त्यांनी काँग्रेसचा राजीनामाही दिला आहे.
आज ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या वडिलांची 75 वी जयंती आहे. याच दिवशी सिंधिया मोठी घोषणा करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जात असून त्यांना राज्यसभा सदस्यता आणि केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. जर सिंधिया यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तर त्यांच्या आजी विजयाराजे सिंधिया यांचे स्वप्न ते पूर्ण करू शकणार आहेत.
राजमाता नावाने प्रसिद्ध असलेल्या विजयाराजे सिंधिया या राष्ट्रीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यांमध्ये होत्या. त्यांना असे वाटत होते की त्यांचे पूर्ण कुटुंब भाजपमध्ये यावे. आता त्यांचे हे स्वप्न ज्योतिरादित्य पूर्ण करताना दिसत आहेत. ग्वाल्हेरवर राज्य करणाऱ्या राजमातानी 1957 मध्ये काँग्रेसमधून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. त्या गुना लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या. केवळ 10 वर्षांत त्यांचा अपेक्षभंग झाला आणि 1967 मध्ये त्यांनी संघाची वाट धरली. त्यांच्या नेतृत्वातच ग्वाल्हेर क्षेत्रात संघाची ताकद वाढली. एवढी की 1971 मध्ये इंदिरा गांधीच्या लाटेतही या भागातून भाजपाचे तीन खासदार निवडून लोकसभेवर गेले होते. या लाटेने भारताला भावी, कणखर असा पंतप्रधान दिला. ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. राजमाता भिंडमधून, वाजपेयी ग्वाल्हेर आणि राजमाता यांचे पूत्र आणि ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव गुनामधून खासदार झाले.
गुनावर सिंधियांचे वर्चस्व होते. माधवराव हे वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी खासदार झाले होते. मात्र, त्यांचे मन जनसंघात लागले नाही. 1977 मध्ये आणीबाणीवेळी त्यांचे आणि राजमाता यांचे रस्ते वेगवेगळे झाले. 1980 मध्ये माधवरावांनी काँग्रेसमधून निवडणूक लढविली आणि केंद्रीय मंत्री बनले. तर मुलगा फुटल्याने राजमातांनी मुलगी वसुंधरा राजे सिधियांना राजकारणात आणले. 1984 मध्ये त्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिनीमध्ये सहभागी झाल्या. त्यानंतर त्या राजस्थानच्या मुख्यमंत्रीही राहिल्या आहेत. तर ज्योतिरादित्य यांची आणखी एक आत्या यशोधरा या भाजपमधून पाचवेळा आमदार आणि मंत्री राहिल्या आहेत.