नवी दिल्ली - अलीकडच्या काळापर्यंत राहुल गांधी यांचे निकटवर्तीय राहिलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी नुकतीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ज्योतिरादित्य शिंदेच्या या निर्णयामुळे मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे सरकार अडचणीत सापडले आहे. दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदें यांच्या भाजपाप्रवेशाबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रथमच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजकीय भवितव्याच्या काळजीतून विचारसरणी गुंडाळून ठेवली आणि ते आरएसएससोबत गेले, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली.
ज्योतिरादित्य शिंदेंच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले की, ‘ही विचारसरणीची लढाई आहे. ज्यात एकीकडे काँग्रेस आहे आणि दुसरीकडे भाजपा आणि आरएसएस आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या विचारसरणीविषयी मला बऱ्यापैकी माहिती आहे. त्यांच्यासोबत माझी मैत्री जुनी आहे. आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकलो. त्यामुळे मी त्यांना चांगल्यापद्धतीने ओळखतो.’’
‘’ज्योतिरादित्य शिंदे गेल्या काही काळापासून त्यांना आपल्या राजकीय भवितव्याबाबत काळजी वाटत होती. त्यामुळेच त्यांनी आपली विचारसरणी गुंडाळून ते आरएसएससोबत गेले. मात्र भाजपामध्ये त्यांना काँग्रेसप्रमाणे मानसन्मान मिळणार नाही. त्यांनी जे काही केले आहे त्याची जाणीव त्यांना लवकरच होईल.’’असा दावा राहुल गांधी यांनी यावेळी केला.
दरम्यान, राज्यसभेसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांबाबत विचारले असता राहुल गांधी म्हणाले की ,’’मी आत काँग्रेसचा अध्यक्ष नाही. मी राज्यसभेच्या उमेदवारांबाबत निर्णय घेत नाही आहे. मी देशाच्या तरुणांना अर्थव्यवस्थेबाबत सांगत आहे. माझ्या टीममध्ये कोण आहेत आणि कोण नाही आहेत, याला काहीच अर्थ नाही.’’
संबंधित बातम्या
राहुल गांधींसमोर आता पायलट-गेहलोत यांच्यातील मतभेद मिटविण्याचे आव्हान