- लोकमत न्यूज नेटवर्क
निमच (मध्यप्रदेश) : शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघालेले काँग्रेसचे नेते खा. ज्योतिरादित्य शिंदे आणि खा. कांतीलाल भुरिया यांना पोलिसांनी रतलाम जिल्ह्यात अटक केली. ते दोघे मंदसौरकडे निघाले असताना त्यांना अडवण्यात आले. त्यांनी रतलाम येथेच ठिय्य आंदोलन सुरू केले, तेव्हा पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे शेकडो स्थानिक कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी झाले होते.मंदसौरला निघालेले पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनाही निमच जिल्ह्यात मंगळवारी अटक करण्यात आली. पटेल यांना जिल्ह्यातील नयागाव येथे अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.हार्दिक पटेल जनता दल यूचे नेते अखिलेश कटियार यांच्यासोबत मंदसौरला जात होते. कटियार यांनाही अटक करण्यात आली. या दोघांची नंतर जामिनावर सुटका करून त्यांना मध्यप्रदेशच्या बाहेर सोडण्यात आले.कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू असतानाच गेल्या २४ तासांत मध्यप्रदेशात ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. राज्यात १ जून रोजी सुरू झालेल्या आंदोलनात ६ जून रोजी मंदसौर येथे पोलिसांनी गोळीबार केला. त्यात सहा शेतकरी मरण पावले आहेत. मी दहशतवादी नाहीमी काही दहशतवादी नाही. मी लाहोरहून आलेलो नाही. मी एक भारतीय नागरिक असून, मला देशात कुठेही जाण्याचा अधिकार आहे. त्याने केंद्र्रातील भाजपप्रणीत रालोआ सरकारवरही टीका केली. ५० कोटी शेतकरी या सरकारविरुद्ध एकजूट झाले असल्याचेही हार्दिक पटेल म्हणाला.