भाजपाकडून EVM मध्ये छेडछाड होण्याची ज्योतिरादित्य शिंदेंना शंका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 04:54 PM2018-12-01T16:54:26+5:302018-12-01T16:54:56+5:30
मध्य प्रदेशात मतदान झाल्यानंतर जनमताच्या कौल बदलवण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून इव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकते
भोपाळ - सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये झालेल्या अटीतटीच्या प्रचारानंतर मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. मात्र मतदान झाल्यानंतर जनमताच्या कौल बदलवण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून इव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकते, अशी भीती राज्यातील काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना वाटत आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी इव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमवर कडेकोट पहारा द्यावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यादरम्यान सर्व इव्हीएम कडेकोट पहाऱ्यात स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या कडक सुरक्षेत ठेवण्यात आलेल्या या इव्हीएममध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचा आरोप ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला आहे. "भोपाळमध्ये स्ट्राँग रूमच्या बाहेर लावलेली एलइडी बंद होणे, सागर जिल्ह्यात गृहमंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात राखीव इव्हीएम मशीन 48 तास उशिराने पोहोचणे, सटणा-खरगोन येथे अज्ञात बॉक्समधून इव्हीएम स्ट्राँग रूममध्ये नेण्यात येत असल्याचा व्हिडीओ कुठे ना कुठे मोठे छडयंत्र रचले जात असल्याकडे इशारा करत आहेत,'' असा आरोप शिंदे यांनी ट्विटरवरून केला.
भोपाल में स्ट्रांग रूम के बाहर लगी एलईडी बन्द होना, सागर में गृहमंत्री की विधानसभा सीट की रिजर्व ईवीएम मशीनों का 48 घंटे बाद पहुँचना, सतना-खरगोन में अज्ञात बक्से स्ट्रांग रूम में ले जाने के वीडियो का सामने आना कही ना कही बड़ी साजिश की और इशारा है।
— Jyotiraditya Scindia (@JM_Scindia) December 1, 2018
''भाजपाला आपला संभाव्य पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे लोकशाही आणि जनमत यांना पायदळी तुडवण्यासाठी भाजपाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. हा सरकारी संरक्षणाखाली लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने लवकरात लवकर कठोर पावले उचलून दोषींवर कारवाई करून इव्हीएमच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.