नवी दिल्ली - मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. दुपारी 12.30 वाजता होणारा हा प्रवेश दुपारी 2.55 ला घेण्यात आला. दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. त्यानंतर, ज्योतिरादित्य शिंदेंनीकाँग्रेस नेतृत्वावर टीका केली. काँग्रेसमध्ये नवं नेतृत्वा मान्य होत नसल्याचं ते म्हणाले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुकही केले. ज्योतिरादित्य यांच्या या निर्णयाचा त्यांच्या दोन्ही आत्यांना अत्यानंद झालांय.
'मोदींच्या हातात देशाचे भविष्य सुरक्षित', ज्योतिरादित्य शिंदेंची 'मन की बात'
आज राजमातासाहेब आपल्यात असत्या तर, आपल्या या निर्णयाचा त्यांना अभिमान वाटला असता. ज्योतिरादित्य यांनी राजमाता यांच्या संस्कारातून मिळालेल्या उच्च आदर्शांचे अनुकरण करत देशहितासाठी हा निर्णय घेतला आहे. ज्योतिरादित्य यांच्या या निर्णयाचा मी व्यक्तिश: आणि राजकीयदृष्ट्या स्वागत करते, असे राजस्थानमधील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधराराजे यांनी म्हटलं. वसुंधराराजे या
ज्योतिरादित्य यांच्या आत्या आहेत, त्यामुळे आपल्या भावाच्या मुलाच्या या निर्णयाचा त्यांना अधिक आनंद झाला आहे. ज्योतिरादित्य यांच्या दुसऱ्या आत्या अन् भाजपा नेत्या यशोधरा राजे यांनीही भाजपा प्रवेशावर प्रतिक्रिया देताना, अतिश आनंद झाल्याचे म्हटले आहे. तसेच, मध्य प्रदेशात भाजपा नेते शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार स्थापन होईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच, ज्योतिरादित्य यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
आपल्या भाजपा प्रवेशानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांचे ज्योतिरादित्य शिंदेंनी आभार मानले. माझ्या आयुष्यात 2 तारखांना अतिशय महत्त्व आहे, 30 सप्टेंबर 2001 रोजी माझ्या वडिलांचे निधन झाले. या दिवसामुळे माझं आयुष्य बदललं. तर, दुसरी तारीख 10 मार्च 2020 जी वडिलांची 75 वी जयंती आहे. ज्यादिवशी मी एक मोठा निर्णय घेतलाय. राजकारण करत असताना, भारत मातेची सेवा करणं हेच उद्देश असायला हवं, तर राजकारण हा त्याच्या उद्देशपूर्तीचा मार्ग असावा. माझ्या वडिलांनी मध्य प्रदेश आणि देशाची सेवा केली. मी काँग्रेस पक्षातून आता भाजपाता काम सुरू करतोय, असे म्हणत काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली. ''काँग्रेस पहिल्यासारखी राहिली नाही. सध्या, जनसेवेचा उद्देश काँग्रेस संघटनेतून पूर्ण होत नाही, असे म्हणत काँग्रेस नेतृत्वावर शिंदेंनी टीका केलीय.
ब्रेकिंग! ज्योतिरादित्य शिंदेच्या हाती 'कमळ'; मध्य प्रदेशात भाजपाला मोठं बळ
दरम्यान, काँग्रेसचे मातब्बर नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने मध्य प्रदेशात राजकीय भूकंप झाला आहे. शिंदेंसोबत १८ ते २० आमदारांचा एक गटही फूटून बाहेर पडल्याने मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारही अडचणीत आले आहे. दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपा नेत्या आणि ज्योतिरादित्य शिंदेंच्या आत्या यशोधराराजे शिंदे यांनीही त्यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ही ज्योतिरादित्य शिंदे यांची घरवापसीच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.