नवी दिल्ली/भोपाळ : काँग्रेसमधून मंगळवारी बाहेर पडलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही वेळातच त्या पक्षाने त्यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे आपल्या आमदारांना भाजपने फोडू नये, यासाठी काँग्रेसने आपल्या ९८ आमदारांना जयपूरला पाठविले आहे, तर काँग्रेसही आपल्या उमेदवारांना स्वत:कडे खेचेल, या भीतीने भाजपने आपल्या १0२ आमदारांना गुरगावच्या पंचतारांकित हॉटेलात नेले आहे.
काँग्रेसचे २२ फुटीर आमदार बंगळुरूमध्ये आहेत. तिथे भाजपचे सरकार आहे. हे आमदार उतरलेल्या हॉटेलबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज निदर्शने केली. त्या आमदारांना पक्षात परत आणण्याची जबाबदारी डी. के. शिवकुमार यांच्याकडे काँग्रेसने सोपवली आहे. त्यामुळेच त्यांना आजच कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले. या फुटीर आपले राजीनामे अध्यक्षांकडे पाठविले असले तरी ते मंजूर झालेले नाहीत. आमदारांशी बोलूनच राजीनाम्याचा निर्णय घेऊ , असे विधानसभाध्यक्षांनी जाहीर केले केले. त्यामुळे या आमदारांना पुन्हा पक्षात आणण्याचे कमलनाथ यांचे प्रयत्न दिसत आहेत. मुख्यमंत्री कमलनाथ व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी २२ पैकी १३ आमदार पुन्हा परततील, असा विश्वास व्यक्त केला. सप व बसपचे आमदारही आमच्यासोबत असल्याचा दावा त्यांनी व्यक्त केला. पण आम्ही निश्चितपणे बहुमत सिद्ध करून दाखवू, असे स्वत: कमलनाथ आणि त्यांच्यासोबतचे सर्व आमदार आत्मविश्वासाने सांगत आहेत.विधानसभा संख्याबळ १0२ विरुद्ध १0७कमलनाथ यांनी तर भाजप आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या भीतीने भाजपने आपल्या आमदारांना हरयाणातील गुरगावमध्ये हलविले आहे. हरयाणात भाजपची सत्ता आहे. आजच्या संख्याबळानुसार भाजपकडे १0७ तर कमलनाथ यांच्यामागे १0२ आमदार दिसत आहेत. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली, तर या संख्याबळाअभावी कमलनाथ सरकार कोसळेल.