नवी दिल्ली/भोपाळ : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह व खा. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात ऐन निवडणुकीच्या प्रचार काळात वादावादी झाल्याचे वृत्त पसरताच, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, आमच्यात वाद झालेले नाहीत आणि ज्योतिरादित्य शिंदे हे मला माझ्या मुलासारखे आहेत, असे स्पष्टीकरण दिग्विजय सिंह यांनी दिले आहे.दिग्विजय सिंह व ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात उमेदवारी कोणाला द्यायची यावरून वाद झाल्याचे वृत्त आले होते. एवढेच नव्हे, तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोरच हा प्रकार घडला होता आणि या प्रकारामुळे नाराज झाल्याचे सांगण्यात येत होते. पुढे सोनिया गांधी यांनी हा वाद मिटवल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या, तसेच तिकीटवाटपासाठी त्रिसदस्य समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह यांनी स्वत:हून खुलासा केला की, त्यांना तसे करण्यास सांगण्यात आले, हे मात्र समजू शकलेले नाही. बहुधा त्यांना तसा खुलासा करण्यास सांगण्यात आले असावे, असे दिसते. याचे कारण दिग्विजय सिंह यांना यासंदर्भात कोणी प्रश्न विचारला नव्हता. तरीही त्यांनी स्वत:हून टष्ट्वीट करून ज्योतिरादित्य शिंदे हे मला माझ्या मुलासारखे आहेत, आम्ही दोघे एकमेकांचा आदर करतो, आम्हा दोघांमध्ये उमेदवारी देण्यावरून मतभेद झाले नव्हते, असे त्यांनी नमूद केले आहे.सूत्रे शिंदे व कमलनाथ यांच्याकडेचया वादाच्या बातम्यांनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी बोलण्याचे टाळले होते. ते व कमलनाथ यांच्याकडेच प्रामुख्याने मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वरिष्ठ नेते असलेल्या दिग्विजय सिंह यांच्याकडून त्यांच्या वाचाळपणामुळे सरचिटणीसपदाची सूत्रे याआधीच काढून घेण्यात आली आहेत.त्यांच्यामुळे राज्यात काँग्रेस व बसपा यांची आघाडी झाली नसल्याची चर्चा मध्यंतरी होती. स्वत: मायावती यांनीही तसा आरोप केला होता. तरीही वरिष्ठ नेते म्हणून दिग्विजय सिंह यांचे सहकार्य घेण्याच्या सूचना मध्यप्रदेशच्या सर्व नेत्यांना देण्यात आल्या आहेत.
ज्योतिरादित्य शिंदे हे मला मुलासारखे - दिग्विजय सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 4:56 AM