काँग्रेसमध्ये परत जाण्यास ज्योतिरादित्य शिंदे यांचा ठाम नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 04:31 AM2020-06-07T04:31:51+5:302020-06-07T04:32:03+5:30

बातम्या बिनबुडाच्या असल्याची टीका । भाजपला सोडचिठ्ठी देणार नाही

Jyotiraditya Shinde strongly refuses to return to Congress | काँग्रेसमध्ये परत जाण्यास ज्योतिरादित्य शिंदे यांचा ठाम नकार

काँग्रेसमध्ये परत जाण्यास ज्योतिरादित्य शिंदे यांचा ठाम नकार

Next

नितीन अग्रवाल 

नवी दिल्ली : काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलेले मध्य प्रदेशमधील महत्त्वाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपण पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही असे ठामपणे सांगितले आहे. तसेच भाजपला सोडचिठ्ठी देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. माझ्याबाबत सोशल मीडियावर झळकलेल्या सर्व बातम्या बिनबुडाच्या आहेत असेही शिंदे म्हणाले.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी टिष्ट्वटरवरील आपल्या हॅशटॅगमधून भाजपचे नाव वगळले असून त्यामुळे ते आता लवकरच या पक्षाला सोडचिठ्ठी देतील अशा बातम्या सोशल मीडियातून पसरल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क लढविले जात होते. यासंदर्भात शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, ज्योतिरादित्य हे भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये जाणार ही चर्चा निरर्थक आहे. त्यांनी सोशल मीडियातील आपल्या बायोडेटात कोणतेही बदल केलेले नाहीत. ते क्रिकेटप्रेमी व जनतेचा सेवक असल्याचे आधीपासूनच त्यांच्या बायोडेटात लिहिलेले आहे व तो मजकूर आजही कायम आहे.
टिष्ट्वटरवरील हॅशटॅगमधून भाजपचे नाव वगळल्याच्या बातम्यांबाबत ज्योतिरादित्य शिंदे यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, खोट्या बातम्या वाऱ्याच्या वेगाने पसरतात ही वाईट गोष्ट आहे. लोकांनी सत्य जाणून घ्यायला हवे. मध्य प्रदेशमधील व केंद्रातील सरकारच्या कामकाजाबद्दल तसेच पक्षाच्या कार्यक्रमांबद्दल ज्योतिरादित्य शिंदे सोशल मीडियातून लोकांना सातत्याने माहिती देत असतात. आपण भाजपचे नेते आहोत हे दर्शविणारे छायाचित्रही त्यांनी टिष्ट्वटरवरील प्रोफाइलवर झळकविले आहे. मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर-चंबळ, बुंदेलखंड, माळवा या आपल्या प्रभावक्षेत्रात विधानसभेच्या २४ जागांसाठी होणाºया पोटनिवडणुकांत भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धारही ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

नाराज नेत्यांकडून पसरविण्यात येतात अफवा?
ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश त्या पक्षाच्या काही नेत्यांना रुचलेला नाही. शिंदे यांनी परत यावे असे काही काँग्रेस नेत्यांना वाटते. या दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून शिंदे यांच्याबद्दल उलटसुलट बातम्या व अफवा पसरविण्यात येतात अशी चर्चा आहे. यूपीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन मार्च महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मध्य प्रदेशात त्यांचे समर्थक असलेले २२ आमदारही भाजपमध्ये सामील झाले. त्यामुळे अल्पमतात गेलेले काँग्रेसचे कमलनाथ सरकार कोसळले.

Web Title: Jyotiraditya Shinde strongly refuses to return to Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.