नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक बोलावली, या बैठकीत कमलनाथ यांनी सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे पक्षावर नाराज असून ते भाजपात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह ज्योतिर्रादित्य शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले आहेत.
जोत्यिरादित्य शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार भाजपात प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. या राजकीय हालचाली दरम्यान मंगळवारी भाजपाने विधानसभेतील आमदारांची बैठक बोलावली आहे. यात शिवराजसिंह चौहान यांची गटनेते म्हणून निवड होण्याची दाट शक्यता आहे. राज्याचे प्रभारी महासचिव विनय सहस्रबुद्धे हे सुद्धा भोपाळला जाणार आहेत. दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मंगळवारीच भाजपाच्या संसदीय बोर्डाची बैठक बोलावली आहे.
भाजपातर्फे मध्य प्रदेशातील भावी मुख्यमंत्र्यांच्या नावावर उद्या सायंकाळपर्यंत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय बोर्डाची बैठक होऊ शकते. त्यातच, आज सकाळी ज्योतिर्रादित्य शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे जवळपास त्यांचा भाजपा प्रवेश निश्चित मानला जात आहे. शहा यांच्या भेटीनंतर शिंदे आणि शहा मोदींच्या भेटीला गेले आहेत. मोदींच्या भेटीनंतर आज सायंकाळी ज्योतिर्रादित्य शिंदे भाजपातील प्रवेशाची घोषणा करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे त्यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे समजते. आज ज्येतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे यांची जयंती आहे. त्यामुळे आजच शिंदे समर्थकांसमोर आपल्या भविष्यातील रणनीतीची घोषणा करतील, अशी शक्यता आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कलमनाथ आणि ज्योतिर्रादित्य शिंदे यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून नाराजीचा सूर असल्याचे समजते. त्यामुळेच, भाजपाच्या धोरणांवर आणि निर्णयांवर शिंदे यांच्याकडून सातत्याने कौतुक करण्यात येत होते. तसेच, ट्विटरवरुन शिंदे यांनी भाजपाच्या धोरणांबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन आणि आभारही मानले होते.
दरम्यान, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, आम्ही ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची तब्येत ठिक नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे शिंदे यांच्याशी जास्त बोलणं झालं नाही. पण जो खरा काँग्रेसी आहे तो काँग्रेसमध्येच राहील असंही त्यांनी सांगितले.