नवी दिल्ली - कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द करून जम्मू काश्मीरचे विभाजनाला मंजुरी देणारे विधेयक राज्यसभा आणि लोकसभेमध्ये मंजूर झाले आहे. दरम्यान, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने राज्यसभेपाठोपाठ लोकसभेमध्येही कलम ३७० रद्द करण्यास जोरदार विरोध केला. मात्र काँग्रेसचे अनेक मातब्बर नेते वैयक्तिकरीत्या केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत. आता राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे तरुण नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयास पाठिंबा दिला आहे. हा निर्णय देशहिताचा असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. कलम ३७० बाबत ज्योतिरादित्य शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, जम्मू-काश्मीर आणि लडाखबाबत उचलण्यात आलेली पावले आणि भारतामध्ये त्यांच्या पूर्णपणे करण्यात आलेल्या विलीनीकरणाचे मी समर्थन करतो. मात्र यासाठी घटनात्मक प्रक्रियेचे पूर्ण पालन केले गेले असते तर अधिक चांगले झाले असते. तसे झाले असते तर काही शंका उपस्थित झाल्या नसत्या. मात्र हा निर्णय देशहितासाठी घेतला गेला आहे. मी त्याला पाठिंबा देतो.''
कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय देशहिताचा, ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 8:18 PM