नवी दिल्ली - बिहार विधानसभा निडणुकीप्रमाणेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि इतर राज्यांमधील पोटनिवडणुकांच्या मतमोजणीलाही सुरुवात झाली आहे. त्यामध्ये सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील पोटनिवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने आघाडी मिळवली आहे. मुख्यत्वे मध्य प्रदेशमधील पोटनिवडणुकीतून भाजपा नेते ज्योतिर्रादित्य शिंदे यांचे अस्तित्व पणाला लागला आहे. मात्र, भाजपाला 28 पैकी 20 जागांवर आघाडी मिळत असल्याने ज्योतिर्रादित्यांचा करिश्मा चालल्याचं दिसून येत आहे.
मध्य प्रदेशमध्ये 28 जागांवर पोटनिवडणूक होत असून, येथील 20 मतदारसंघांमधील जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. तर, काँग्रेसने 7 जागांवर आणि बहुजन समाज पक्षाला एका जागेवर आघाडी मिळाली आहे. मध्य प्रदेशमध्ये सरकार टिकवण्यासाठी भाजपाला किमान 9 ते 10 जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. तर काँग्रेसला 28 पैकी 28 जागा जिंकणे आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थिती पाहता भाजपाला सरकार टिकवणे अवघड नसल्याचं दिसून येत आहे.
शिंदेंनी गड राखला
ऐन कोरोना काळात ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ यांच्याविरोधात बंड करत भाजपात प्रवेश केला. यामुळे काँग्रेसची सत्ता गेली आणि शिवराज पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. शिंदे समर्थक आमदारांनी राजीनामे दिल्याने पोटनिवडणूक लागली. यामध्ये शिंदे यांच्यासमोर भाजपात प्रस्थ वाढविण्याचे आव्हान पेलावे लागले. तर दुसरीकडे सत्तेवरून पायउतार व्हावे लागल्याचे शल्य कमलनाथ यांच्या उराशी होते. यामुळे प्रामुख्याने हे मतदारसंघ शिंदे यांचा गड असल्याने शिंदे विरोधात कमलनाथ अशीच लढाई रंगली होती. काँग्रेसच्या 25 आमदारांनी राजीनामा दिला होता. तर तीन आमदारांचे निधन झाल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. काँग्रेस फोडून भाजपात आलेल्या 25 आमदारांना भाजपाने पुन्हा तिकिट दिले होते. यापैकी 14 जण शिवराज सरकारमध्ये मंत्री आहेत. सत्ता टिकविण्यासाठी भाजपाची मदार ज्योतिर्रादित्य शिंदेंवर होती. पोटनिवडणुकांमधील आघाडी पाहता, ज्योतिर्रादित्य शिंदेंनी करुन दाखवलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्येही ७ जागांवर पोटनिवडणूक झाली होती तिची मतमोजणी सुरू असून, यामध्ये भाजपा ४ आणि सपा बसपा प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे. गुजरातमध्ये आठ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सात जागांवर भाजपा आघाडीवर आहे तर एका जागेवर काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. इतर राज्यांच्या विचार केल्यास कर्नाटकमध्ये दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर जागेवर भाजपा आघाडीवर आहे. झारखंडमध्ये दोन जागांवर पोटनिवडणूक होत असून, येथील मतमोजणीत एका ठिकाणी भाजपा आणि एका ठिकाणी काँग्रेस आघाडीवर आहे.