ज्योतिर्रादित्य शिंदेंच्या 2 समर्थकांना मंत्रीपद, जुन्या भाजपा आमदारांना वेट अँड वॉच
By महेश गलांडे | Published: January 3, 2021 04:20 PM2021-01-03T16:20:48+5:302021-01-03T16:21:53+5:30
तुलसी सिलावट आणि गोविंद सिंह राजपूत हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी नेते होते. मात्र, ज्योतिर्रादित्य शिंदेंसोबत त्यांनीही भाजपाचे कमळ हाती घेतले होते. त्यामुळे, काँग्रेस सरकार पडल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
भोपाळ - मध्य प्रदेश सरकारने पोटनिवडणुकांनंतर पहिल्यांदाच मंत्रिमंडळाचा विस्तार केला असून शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात भाजपा नेते ज्योतिर्रादित्य शिंदे यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी दोन नवीन आमदारांना आज मंत्रीपदाची शपथ दिली. आमदार तुलसी सिलावट आणि गोविंद सिंह राजपूत यांना मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाच्या अनेक नेत्यांची नावे आघाडीवर होती, मात्र त्यांना अजून वाट पाहावी लागणार आहे.
तुलसी सिलावट आणि गोविंद सिंह राजपूत हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी नेते होते. मात्र, ज्योतिर्रादित्य शिंदेंसोबत त्यांनीही भाजपाचे कमळ हाती घेतले होते. त्यामुळे, काँग्रेस सरकार पडल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदी चौथ्यांदा विराजमान झाल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी कॅबिनेट मंत्रीमंडळाचा विस्तार केला. त्यामध्ये 5 जणांचा मंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती. त्यामध्ये तुलसी सिलावट आणि गोविंद सिंह राजपत यांनाही संधी मिळाली होती. मात्र, 6 महिन्यात पोटनिवडणूक न लागल्यामुळे त्यांना आपल्या मंत्रीपदाची राजीनामा द्यावा लागला होता. पण, नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी विजय मिळवला. त्यानंतर, आज झालेल्या मंत्रीमंडळ विस्तार कार्यक्रमात शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रीमंडळात त्यांना स्थान देण्यात आले आहे.
दरम्यान, शिवराजसिंह यांच्या सरकारमध्ये आणखी तीन जागा शिल्लक असून तेथे कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.