मध्य पूर्ण आशियामध्ये इस्राइल आणि हमास या दहशतवादी संघटनेमध्ये मागच्या १० महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या संघर्षामध्ये पॅलेस्टाइनमधील गाझा शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. इस्राइल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने इस्राइलविरोधात भूमिका घेतलेली नाही. दरम्यान, भारतातील विरोधी पक्षांच्या एका गटाने नुकतीच पॅलेस्टाइनच्या एका नेत्याची भेट घेतली. तसेच पॅलेस्टाइनी नागरिकांच्या सुरू असलेल्या नरसंहाराचा निषेध केला. तसेच भारत सरकराने इस्राइलला हत्यारे आणि दारुगोळ्याचा पुरवठा रोखावा, अशी मागणी केली. या भेटीदरम्यान, केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील भाजपाच्या एका मित्रपक्षानेही उपस्थिती दर्शवल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
दिल्लीमध्ये पॅलेस्टाइनी नेते मोहम्मद मकरम बलावी यांची भारतातील विरोधी पक्षांच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यामध्ये काँग्रेस, समाजवादी पक्ष, आप या पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता. या नेत्यांबरोबरच केंद्रातील सत्ताधारी असलेल्या एनडीएमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या जेडीयूचे नेते के. सी. त्यागी यांनीही या शिष्टमंडळासोबत पॅलेस्टाइनच्या नेत्याची भेट घेतली. या भेटीदरम्यान, पॅलेस्टाइनचे नेते मकरम बलावी यांनी इस्राइलकडून होत असलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या उल्लंघनाबाबत सविस्तर चर्चा केली. के. सी. त्यागी यांनी पॅलेस्टाइनी नेत्याची भेट घेतल्याने आता इस्राइल आणि पॅलेस्टाइन यांच्यामधील संघर्षादरम्यान, जेडीयूची भूमिका ही केंद्र सरकारच्या भूमिकेपेक्षा वेगली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी विरोधी पक्षांच्य शिष्टमंडळाने एका पत्रकाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यात पॅलेस्टाइनी नागरिकांच्या सुरू असलेल्या नरसंहाराचा निषेध करण्यात आला. तसेच महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा हवाला देत १९८८ मध्ये पॅलेस्टाइनला मान्यता देणारा भारत हा पहिला बिगर अरब देश असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचेही सांगितले.