हरिश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली:तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय पक्षाची स्थापना करून २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या लढाईत उडी घेतली असून, त्यांच्या एंट्रीने स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. त्यांचा प्रादेशिक पक्ष तेलंगणा राष्ट्रीय समिती आता भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या नावाने ओळखला जाणार आहे.
आपण भाजपशी दोन हात करणार आहोत, असे ते म्हणत असले तरी त्यांच्यामुळे २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे काम अधिक अवघड होणार आहे. केसीआर यांनी राष्ट्रीय पक्षाची घोषणा करण्यापूर्वी संपूर्ण भारतभर प्रवास केलेला आहे व विविध राज्यांतील आपल्या समपदस्थ नेत्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत. ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल), नितीशकुमार (बिहार), अरविंद केजरीवाल (दिल्ली), एम. के. स्टालिन (तामिळनाडू), पिनराई विजयन (केरळ) व नवीन पटनाईक (ओडिशा) या नेत्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे.
तेलंगणामध्ये काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष असल्यामुळे केसीआर हे सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र आणू इच्छित आहेत. परंतु हे काम त्यांनी यापूर्वी ठरविल्याप्रमाणे होताना दिसत नाही. कारण त्यांनी राष्ट्रीय पक्षाची घोषणा करताना केवळ दोनच प्रादेशिक पक्षांचे नेते - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी (जेडी-एस) व डीएमकेचे सहयोगी थोल थिरुमावलावन उपस्थित होते.
तेलंगणा विकास मॉडेलचा डंका वाजणार
- नरेंद्र मोदींनी २०१४च्या निवडणुकीपूर्वी ज्याप्रमाणे गुजरात मॉडेलचा डंका वाजवला त्याचप्रमाणे केसीआर तेलंगणा विकास मॉडेलचा डंका वाजवू इच्छित आहेत.
- अगदी आपचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली मॉडेल दाखवूनच पंजाबमध्ये बहुमत मिळविले होते.
- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी २०२४च्या निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरल्याचे सांगत विरोधकांना अगोदरच एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
- केसीआर यांचा राष्ट्रीय राजकारणातील प्रवेश विरोधकांची मते विभागून केवळ भाजप व मोदी यांना मदत करण्यासाठी आहे, असे काँग्रेसने आधीच स्पष्ट केलेले आहे.
- विशेष म्हणजे कर्नाटकात २०२३च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आघाडी करण्यासाठी जेडीएसने काँग्रेसशी बोलणी सुरू केलेली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"