नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,00,28,709 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 50,848 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,358 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,90,660 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मीडियावर गंभीर आरोप केला आहे. मीडिया कोरोनाबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे असा आरोप केला आहे. तसेच आपण फक्त पॅरासिटामॉल आणि अँटिबायोटिक औषधं खाऊन बरे झालो असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
के. चंद्रशेखर राव (Telangana CM KC Rao) यांना एप्रिलमध्ये कोरोनाची (Corona Virus) लागण झाली होती. फक्त दोन औषधांच्या सेवनाने ते आठवड्याभरात कोरोनातून बरे झाले असा दावा त्यांनी केला आहे वारंगल येथील्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे. "माहीत नाही कोण ब्लॅक फंगस, यलो फंगस अशा आजारांबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत. कोणती वाहिनी आहे की कोणता पेपर आहे माहीत नाही. फंगस जिवंत आहे की निर्जीव पण लोक या गोष्टी ऐकून मरत आहेत. मी सांगतो, या टीव्हीवाल्यांना शाप लागेल" असं चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे.
आपल्याला कोरोनाची लागण झाली होती त्यावेळचा अनुभव सांगताना राव म्हणाले की, त्यांना डॉक्टरांनी फक्त दोन गोळ्या दिल्या होत्या आणि ते आठवड्याभरात बरे झाले. "मीडिया लोकांना घाबरवत आहेत. अशा प्रकारे विनाकारण भीती पसरवण्याची काय गरज? मीडिया खरी परिस्थिती चुकीच्या पद्धतीने मांडत आहेत. कोरोना नसतानाही सरकारी रुग्णालयांमध्ये जागा मिळत होती का? डॉक्टर कधीच रुग्णांना उपचार नाकारत नाहीत. कारण त्यांना माहीत आहे की गरीब फक्त सरकारी रुग्णालयांमध्येच उपचार घेऊ शकतात. त्यामुळे ते रुग्णांना जमिनीवरच बसवतात आणि त्यांचे उपचार करतात. मात्र मीडिया काय करते, फोटो काढते आणि सांगते की रुग्णांना सरकारी रुग्णालयांमध्ये जमिनीवर झोपायला लागतं" असं ही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"सरकारच्या आकडेवारीपेक्षा कोरोना मृतांची संख्या 43 पट जास्त"; अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी योगी सरकारवर (Yogi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीत फेरफार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी आता केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सरकारच्या आकडेवारीपेक्षा कोरोना मृतांची संख्या 43 पट जास्त आहे असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे. तसेच योगी सरकार मृत्यूंचे आकडे नाही तर स्वत:चं तोंड लपवत आहे अशी बोचरी टीका ही अखिलेश यांनी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "माहितीच्या आधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, असे दिसून आले आहे की, 31 मार्च, 2021 पर्यंत 9 महिन्यांत उत्तर प्रदेशातील 24 जिल्ह्यांमध्ये मृतांची संख्या सरकारच्या आकडेवारीपेक्षा 43 पट जास्त आहे. त्यामुळे भाजपा सरकार मृत्यूची आकडेवारी नव्हे तर आपलं तोंड लपवत आहे" असं अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.