नवी दिल्ली : कर्नाटकमधील प्रशासकीय सेवेतील अधिकारी के. मथाई यांनी राज्याचे मुख्य सचिव यांच्यासह दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. इमानदारीत प्रशासकीय सेवा केल्यामुळे गेल्या दहा वर्षात 27 वेळा बदली करण्यात आल्याचा आरोप के. मथाई यांनी केला आहे. याशिवाय, त्यांची पदोन्नती, इंसेंटिव्ह आणि मिळणाऱ्या इतर सुविधा थांबविण्यात आल्या आहेत. के. मथाई सध्या कर्नाटक प्रशासकीय सेवेत सहाय्यक आयुक्त पदावर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य मानवाधिकार आयोगाने के. मथाई यांचा तक्रार अर्ज मंजूर केला आहे. या तक्रारीत के. मथाई यांनी राज्याचे मुख्य सचिव विजय भास्कर यांच्यासहित दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे. मंड्यामध्ये कार्यरत असताना 300 कोटी रुपयांचा जमीन घोटाळा उघडकीस आणला होता. तसेच, बीबीएमपीमध्ये 2000 कोटींचा घोटाळा समोर आणला होता. तेव्हापासून नेतेमंडळी आणि अधिकारी मला त्रास देत असल्याचे के. मथाई यांनी म्हटले आहे.
के. मथाई म्हणाले, 'लोकायुक्तांनी माझे ऐकले नाही. मुख्य सचिवांनी सुद्धा कानाडोळा केला. मुख्यमंत्री वेळ देत नाहीत. सर्व दरवाजे बंद झाले. त्यामुळे मी राज्य मानवाधिकार आयोगाचा दरवाजा ठोठावला. माझ्याजवळ कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता.' दरम्यान, याप्रकरणी कर्नाटकचे मुख्य सचिव विजय भास्कर यांनी नोटीस आल्यानंतर उत्तर देऊ असे म्हटले आहे. ते म्हणाले, 'याप्रकरणी अद्याप कोणतीही मला नोटीस आली नाही. ज्यावेळी नोटीस येईल, त्यावेळी उत्तर देऊ.'