नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. निवडणुकीच्या रिंगणात अनेक उमेदवार आहेत. या उमेदवारांमध्ये असा एक उमेदवार आहे, ज्याने आतापर्यंत २०० पेक्षा जास्त वेळा निवडणूक लढवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांसारख्या बड्या नेत्यांविरोधात निवडणूक लढवली. यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे, पण हिंमत कधीच हरली नाही. त्यामुळेच तमिळनाडूतील हा उमेदवार विजयासाठी नव्हे तर पराभवासाठी जगभर ओळखला जातो. के. पद्मराजन असे या उमेदवाराचे नाव आहे.
६५ वर्षीय के. पद्मराजन यांच्या नावावर एक विश्वविक्रमही नोंदवला गेला आहे. २३८ वेळा निवडणुकीत पराभूत झालेल्या के पद्मराजन यांचे नाव 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये भारतातील सर्वात अयशस्वी उमेदवार म्हणून नोंदवले गेले आहे. २०११ मध्ये मेत्तूर विधानसभा निवडणुकीत उभे असताना त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. त्यावेळी त्यांना ६२७३ मते मिळाली, तर अंतिम विजयी उमेदवाराला ७५,००० पेक्षा जास्त मते मिळाली होती. दरम्यान, के. पद्मराजन यांना इलेक्शन किंगसह 'वर्ल्ड बिगेस्ट इलेक्शन लूझर' ही पदवी मिळाली आहे. २३८ वेळा निवडणूक पराभूत झालेले के. पद्मराजन पुन्हा तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
कोणत्या उद्देशाने निवडणूक लढवतात?के. पद्मराजन हे टायर दुरुस्तीच्या दुकानाचे मालक आहेत. के. पद्मराजन यांनी १९८८ मध्ये तामिळनाडूमधील मेत्तूर या गावी निवडणूक लढवण्यास सुरुवात केली. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरला, तेव्हा त्यांना लोक हसले. पण त्यावेळी के. पद्मराजन म्हणाले होते की, एक सामान्य माणूसही निवडणूक लढवू शकतो, हे मला सिद्ध करायचे आहे. सर्व उमेदवारांना निवडणूक जिंकायची आहे, पण मला तशी इच्छा नाही. पराभव झाल्यानंतर मला आनंद होतो. सर्वसामान्य माणूसही निवडणूक लढवू शकतो, असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण करणे हाच माझा उद्देश आहे.