नवी दिल्ली - प्रसिद्ध शास्त्रज्ञ के. सिवन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते ए. एस. किरण कुमार यांची जागा घेतील. सिवन यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. कार्मिक मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीसंबंधीच्या समितीने आंतरराष्ट्रीय आंतरिक्ष विभागातील सचिव पद आणि अंतराळ आयोगाच्या अध्यक्षपदावरील त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.
सिवन हे सध्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्रामध्ये निर्देशक म्हणून काम पाहत आहेत. सिवन हे कुमार यांची जागा घेणार आहेत. कुमार यांची नियुक्ती 12 जानेवारी 2015 रोजी झाली होती. सिवन यांनी 1980 मध्ये मद्रास इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एअरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली होती. त्यानंतर 1982 साली त्यांनी बंगळुरूमधील आयआयएससीमधून एअरोस्पेस इंजिनियरिंगमधून पदव्युत्तर पदवी मिळवली होती. पुढे 2006 साली त्यांनी आयआयटी मुंबई येथून त्यांनी एअरोस्पेर इंजिनियरिंगमध्ये पीएचडी पूर्ण केली होती. सिवन यांनी 1982 साली इस्रोमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी पीएसएलव्ही प्रकल्पावर काम केलेले आहे. तसेच त्यांनी एंड टू एंड मिशन प्लानिंग, मिशन डिझाइन, मिशन इंटिग्रेशन आणि अॅनॅलिसिस यामध्ये विपूल योगदान दिले आहे. त्यांचे प्रबंध विविध जर्नलमधून प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.