नवी दिल्ली - देशाच्या सीमारेषेवरील वाढती आव्हानं पाहता भारतीय लष्कराकडून आपले सामर्थ्य वाढवलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर, भारतीय सैन्याला शत्रू देशांच्या नाकीनऊ आणण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यात येणार आहे. नाशिकमधील भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्र देवळाली येथे एम 777 अल्ट्रालाईट होवित्झर आणि के.9 वज्र या दोन नव्या अत्याधुनिक परदेशी बनावटीच्या तोफा भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात तोफखाना केंद्रात ही शस्त्रास्त्र लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. या सोहळ्यासाठी देवळाली तोफखाना केंद्रात लष्करी थाटात जय्यत तयारी करण्यात आली. शिवाय, परिसरात चोख सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली होती.
- भारतीय संरक्षण खाते जलदरित्या आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे
- तीस वर्षानंतर भारतीय सेनेत दोन नव्या अत्याधुनिक तोफा दाखल झाल्या आहेत
लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांची माहिती
- पुढील वर्षात भारतीय सैन्यात 'धनुष्य' आधुनिक तोफ दाखल होणार आहे
- 'डीआरडीओ' अंतर्गत नवीन दोन तोफा देशात तयार केल्या जाणार आहेत
संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2019 पासून भारतीय लष्कराला या तोफांची पूर्तता करण्यात येणार आहे. 24 महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. के.9 वज्र या तोफेव्यतिरिक्त एम 777 अल्ट्रालाईट होवित्झर तोफेचाही सैन्यदलात समावेश होणार आहे. या प्रकल्पाची किमती 5000 कोटी रुपये एवढी आहे. 2021 पर्यंत एकूण 145 एम 777 अल्ट्रालाईट होवित्झर तोफा सैन्यदलाकडे सोपवण्यात येतील. या अत्याधुनिक तोफेचं वजन केवळ 4.2 टन एवढे आहे.