जम्मू-काश्मीर, दि. 31 - जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात असलेल्या जम्मू-काश्मीर बॅंकेवर दहशतवाद्यांनी दरोडा घातल्याची घटना सोमवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यातील अरवानी परिसरात असलेल्या जम्मू काश्मीर बॅंकेवर दहशतवाद्यांनी दरोडा घातला. यावेळी बंदुकधारी दहशतवाद्यांनी बुरखा घालून बॅंकेत प्रवेश केला आणि जवळजवळ पाच लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी बॅंक अधिका-यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरु आहे. तसेच, जिल्ह्यात सर्व ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. दरम्यान, याआधी सुद्धा जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी बॅंक लुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या काही महिन्यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांनी बँक लुटली होती. यावेळी येथील कादर येरीपोरा परिसरात असलेल्या इलाकाई देहाती बॅंकेच्या शाखेवर दहशतवाद्यांनी दरोडा टाकला होता. या दरोड्यात दहशवाद्यांनी 65, 000 रुपयांची रोकड लुटून पोबारा केला होता. तर, त्याच्या आधीच्या दिवशी जम्मू-काश्मीर बँकेच्या कॅश व्हॅनवर कुलगामजवळ दहशतवाद्यांनी हल्ला चढवला होता. या हल्ल्यात दोन बँक कर्मचारी व पाच पोलीस असे सात जण ठार झाले होते. यावेळी दहशतवाद्यांनी 50 लाख रुपये आणि शस्त्रे घेऊन पळ काढला होता. या हल्ल्याची जबाबदारी हिजबुल मुजाहिद्दीनने स्वीकारली होती.
J&K: Terrorists looted Jammu and Kashmir Bank in Anantnag district
— ANI (@ANI_news) July 31, 2017