नवी दिल्ली - भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचे संसदेच्या दोन्ही सभागृहांत स्वतंत्र अस्तित्व पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांना मिळालेली तुटपुंजी मदत यावरून शिवसेनेच्या खासदारांनी शून्य प्रहरात केंद्र सरकारला धारेवर धरले. तर, संजय राऊतांनीदिल्लीतही आपली बॅटींग सुरूच ठेवली आहे. दिल्लीत जाऊन भाजपा नेत्यांवर अप्रत्यक्षपणे राऊत यांनी हल्लाबोल केला.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. त्यासाठी खासदार संजय राऊत दिल्लीत पोहोचले आहेत. दिल्लीतूनही आज त्यांची भाजपाविरुद्ध बॅटींग सुरूच आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यानंतरही, भाजपा-शिवसेनेत शाब्दीक हल्ल्यांचा दैनिक सामना पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी भाजपा नेत्यांना लक्ष्य केलं. भाजपा नेते स्वत:ला भगवान (देव) समजत आहेत. म्हणूनच, आपण काहीही करू शकतो, असे त्यांना वाटते. कभी कभी लगता है, अपुनही भगवान है... असा त्यांचा समज झाला आहे. मात्र, देशात मोठ-मोठे बादशहा येऊन गेले, पण लोकशाही कायम आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांनी हा समज चुकीचा आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे. एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी कुणीच्या मालकीची संपत्ती नाही. त्यामुळे आम्हाल न विचारत घेता, शिवसेनेला एनडीएमधून बाहेर काढलेच कसे? असा सवालही राऊत यांनी विचारला आहे. दरम्यान, शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असली तरी, अजून काँग्रेसप्रणीत यूपीएमध्ये सामील झालेली नाही. तर, शिवसेना युपीएमध्ये सामिल होणार नसल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यासोबतच, संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून शेरो-शायरीद्वारे भाजपावर टीकास्त्र सोडले. तुम से पहले वो जो इक शख़्स यहाँ तख़्त-नशीं था उस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था :-अशा आशयाची शायरी करत संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना लक्ष्य केलं आहे. मात्र, राऊत यांच्या या ट्विला रिप्लाय देताना, अनेकांनी शिवसेना आणि संजय राऊत यांना टार्गेट केलं आहे.
राऊत यांनी दिवंगत नेते अरुण जेटलींना श्रद्धांजली वाहिली, तसेच त्यांच्या निधनानं मोठी हानी झाल्याचंही ते म्हणाले.