नवी दिल्ली - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सध्या कैलास मानसरोवरची यात्रा करत आहेत. शुक्रवारी सकाळी राहुल गांधींनी यात्रेदरम्यानचे स्वतःचे काही फोटो आणि व्हिडीओ पहिल्यांदा सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यापूर्वी त्यांनी यात्रेसंदर्भातील अनेक फोटो शेअर केले होते. मात्र स्वतः फोटो शेअर करणं टाळल्याचं निदर्शनास आले होते.
शुक्रवारी शेअर केलेल्या फोटो-व्हिडीओमध्ये राहुल गांधी पर्वतरांगांमध्ये अनेक भाविकांसोबत दिसत आहे. शिवाय, नेहमीप्रमाणे त्यांचा पेहरावदेखील वेगळा दिसत आहे. कुर्ता-पायजम्यामध्ये असणारे राहुल गांधी टी-शर्ट, गॉगल, जीन्स जॅकेटमध्ये दिसत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी गुरुवारी कोठेही न थांबता तब्बल 13 तासांपर्यंत पर्वतरांगा सर केल्या आहेत. जवळपास 34 किलोमीटरचा प्रवास त्यांनी पायी केल्याची माहिती समोर आली आहे.
(कैलास-मानसरोवर यात्रेवेळी राहुल गांधींनी नॉन व्हेज खाल्लं?... वाचा हॉटेल मालकाचं म्हणणं)
दरम्यान, राहुल गांधींनी यात्रेदरम्यान मांसाहार केल्याचं वृत्त नेपाळमधील प्रसारमाध्यमांनी दिल्यानं वाद निर्माण झाला होता. यावरुन भाजपानं राहुल गांधींवर निशाणा साधला होता. कैलास मानसरोवर यात्रेला गेले असताना मांसाहार करुन राहुल गांधींनी हिंदूंच्या भावना दुखावल्याची टीका भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केली होती. हा वाद पेटल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनानं स्पष्टीकरण देत राहुल गांधींनी शुद्ध शाकाहारी जेवण मागवलं होतं, अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
राहुल गांधींचा तो फोटो व्हायरल
कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले राहुल गांधी 31 ऑगस्टला काठमांडूतील वूटू नावाच्या हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. हॉटेलमधील राहुल यांचा फोटो हॉटेल व्यवस्थापनानं सोशल मीडियावर शेअर केला होता. 'राहुल गांधींनी हॉटेलला सरप्राईज भेट देत नेवारी भोजनाचा आनंद घेतला,' अशी पोस्ट व्यवस्थापनाकडून फेसबुकवर करण्यात आली होती. यानंतर स्थानिक माध्यमांनी राहुल गांधींनी मांसाहारी जेवण घेतल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं. राहुल यांना चिकन कुरकुरे अतिशय आवडल्याचंदेखील नेपाळी प्रसिद्धी माध्यमांनी वृत्तांकन करताना म्हटलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. यावरुन भाजपानं राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली. हिंदूंच्या भावनांचा अपमान करणं राहुल गांधी आणि काँग्रेससाठी नवीन नाही, अशा शब्दांमध्ये भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय राहुल गांधींवर बरसले.
हॉटेल मालकाचं स्पष्टीकरणया वादानंतर वूटू रेस्टॉरंटकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते. राहुल गांधींनी फक्त शुद्ध शाकाहारी जेवण मागवलं होतं, असं रेस्टॉरंटकडून सांगण्यात आलं. प्रसार माध्यमांनी आमच्याकडून राहुल यांच्या जेवणाविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती, असंही रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनानं स्पष्ट केलं आहे. 'राहुल गांधींनी कोणते पदार्थ ऑर्डर केले होते, याबद्दल आमच्याकडे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, राहुल गांधी यांनी शुद्ध शाकाहारी पदार्थ मागवले होते,' असं वूटू रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनानं स्पष्ट केलं.