कोलकाता ट्रेनी डॉक्टर बलात्कार प्रकरणावरून मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बंगालमध्ये पोलीस, समाजकंटक आणि राजकारणी यांच्यात संबंध आहेत असंही ते म्हणाले. बलात्कार करणाऱ्याकडे पोलिसांची बाईक होती. असं असेल तर महिला सुरक्षित कशा राहतील? असा सवालही त्यांनी विचारला.
भाजपाचे ज्येष्ठ नेते विजयवर्गीय म्हणाले की, "महिला मुख्यमंत्री असलेल्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. मुख्यमंत्री गुन्हेगारांच्या पाठीशी असतील तर अशा मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार आहे का? आजच्या काळात हिटलरनंतर जर कोणी हुकूमशहा असेल तर त्या ममता बॅनर्जी आहेत."
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजच्या ज्युनिअरवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यासाठी शहरात ‘नबन्ना अभियान’ सुरू करण्यात आले आहे. नबन्ना हे पश्चिम बंगाल सरकारचे सचिवालय आहे. महिलांना सुरक्षा न दिल्याबद्दल आंदोलक मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्यावर आरोप करत आहेत.
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजच्या सभागृहात एका ज्युनियर डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येनंतर देशभरात निदर्शने होत आहेत. ९ ऑगस्ट रोजी महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला होता, त्यानंतर कोलकाता पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी संजय रॉयला अटक केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी रॉय ९ ऑगस्ट रोजी सेमिनार हॉलमध्ये प्रवेश करताना दिसत आहे.