नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारद्वारे जानेवारी 2021 पासून बांगलादेश आणि पाकिस्तानच्या निर्वासितांना नागरिकत्व देण्याची शक्यता आहे, असे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. उत्तर 24 परगणा येथे पार्टीच्या 'आर नोय अन्याय' (यापुढे अन्याय होणार नाही) अभियानाच्या निमित्ताने कैलाश विजयवर्गीय यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी शेजारच्या देशांमधून आपल्या देशात येणाऱ्या निर्वासितांना नागरिकत्व देण्याच्या प्रामाणिक हेतूने 'सीएए'ला मंजुरी मिळाली आहे. पश्चिम बंगालमधील निर्वासितांना मोठ्या संख्येने भाजपा नागरिकत्व देण्यास इच्छुक आहे, असे कैलाश विजयवर्गीय म्हणाले. याचबरोबर, कैलाश विजयवर्गीय यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारवर निर्वासितांबद्दल सहानुभूती नसल्याचा आरोप केला.
दरम्यान, कैलाश विजयवर्गीय यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना करताना टीएमसीचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री फिरहद हकीम यांनी पश्चिम बंगालमधील लोकांना मूर्ख बनविण्यासाठी भाजपा प्रयत्न करीत आहे, असे म्हटले. तसेच, फिरहद हकीम म्हणाले की, "नागरिकत्वामुळे भाजपाचा हेतू काय आहे? जर भारताचे नागरिक नाहीत तर ते दरवर्षी विधानसभा आणि संसदीय निवडणुकीत मतदान कसे करतात? भाजपाने पश्चिम बंगालमधील लोकांना फसविणे थांबवावे."