कोलकाता : भाजपाचे महासचिव आणि पश्चिम बंगालमधील पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कैलाश विजयवर्गीय यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी पश्चिम बंगालमधील अधिकाऱ्यांना धमकी दिली आहे. शुक्रवारी येथील पुरुलियामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात जनसमुदायाला संबोधित करताना कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, "आमचे सरकार आल्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांना कोंबडा बनवू." याचबरोबर, कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले की, "ज्यांना कोंबडा बनवायचा आहे, अशा सर्व अधिकाऱ्यांची आम्ही यादी तयार केली आहे. तसेच, सरकारी अधिकाऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास आम्ही शांत बसणार नाही. आम्ही सुद्धा बांगड्या घातल्या नाहीत. आम्ही इमानदारीने काम करत आहोत, याचा अर्थ असा नाही की आम्हाला मर्यादा तोडता येत नाहीत."
या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ज्यावेळी भाजपाचे सरकार बनेल, "त्यावेळी भाजपाचा मुख्यमंत्री होईल. जे अधिकारी चमचेगिरी करत आहेत, भ्रष्टाचार करता आहेत, आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत. त्यांची यादी तयार होत आहे. त्यांची यादी तयार झाल्यानंतर शोलेमधील तोच डायलॉग असले की अब तेरा क्या होगा कालिया."
आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कैलाश विजयवर्गीय याआधीही चर्चेत राहिले आहेत. गेल्या काही दिवासांपूर्वी कैलाश विजयवर्गीय यांनी एका अधिकाऱ्याला धमकी देताना मध्य प्रदेशातील इंदूरला आग लावण्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कैलाश विजयवर्गीय हे इंदूरचे विभागीय आयुक्त आकाश त्रिपाठी यांची भेट घेणार होते. मात्र, त्यांनी भेटण्यास नकार दिला. त्यामुळे कैलाश विजयवर्गीय यांचा तोल सुटला आणि अधिकाऱ्याला थेट धमकी देताना म्हणाले होते,' अधिकारी आहात म्हणून नाहीतर इंदूरला आग लावली असती'.
दरम्यान, कैलाश विजयवर्गीय हे भाजपाचे मोठे नेते आहेत. त्यांचे पुत्र आकाश विजयवर्गीय हे सुद्धा आमदार आहेत. आकाश विजयवर्गीय यांनी जुन्या जीर्ण झालेल्या घराला पाडण्यासाठी आलेल्या इंदूर पालिकेच्या अधिकाऱ्याला चक्क बॅटने मारहाण केली होती. त्यावेळी ते चर्चेत आले होते. या प्रकरणी आकाश विजयवर्गीय यांना अटक झाली होती आणि जामीन मिळण्यापूर्वी काही दिवस तुरुंगाची हवाही खावी लागली होती.
(Video : '...तर इंदूरला आग लावली असती', भाजपा नेत्याचा तोल सुटला)