उत्तर प्रदेश- कैराना आणि नुरपूर पोटनिवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. कैरानातल्या दलित-मुस्लिम भागात ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. भाजपानं या ईव्हीएम मशिनबरोबर छेडछाड केल्याचा आरोपही केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीनं तक्रार करत दोन्ही जागांवरच्या पोटनिवडणुका रद्द करण्याची मागणी केली आहे.पराभवाच्या भीतीनं भाजपानं ईव्हीएम मशिनबरोबर छेडछाड केल्याची टीकाही सपानं केली आहे. माझ्या लोकसभा निवडणूक क्षेत्राला प्रभावित केलं जात असल्याचा आरोप आरएलडी उमेदवार तबस्सुम हसन यानं लावला आहे. स्थानिक प्रशासन दबावात काम करत असल्याचंही चर्चा आहे. दलित, मुस्लिम आणि जाटबहुल भागात ईव्हीएममध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.कैरानातल्या दलित-मुस्लिम भागात ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड करण्यात आला आहे. इतर ठिकाणी तसा कोणताही गोंधळ नाही. माझा विजय होऊ नये, यासाठीच भाजपा प्रयत्नशील असल्याचा आरोप तबस्सुमनं केला आहे. तबस्सुमनं यासंदर्भात निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. तबस्सूमनं कैराना लोकसभा क्षेत्रातील गंगोह, नकुड आणि शामली भागातील बूथमधल्या ईव्हीएम मशिनमध्ये गडबड असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. परंतु भाजपानं या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. भाजपा उमेदवार मृगांका सिंह यांनी ईव्हीएम मशिनमध्ये कोणतीही त्रुटी नसल्याचं सांगत समाजवादी पार्टीचे आरोप फेटाळून लावले आहेत.
कैरानाः दलित-मुस्लिम भागात ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड, पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 2:22 PM