हरियाणातील कैथलमध्ये शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. कार कालव्यात पडली. त्यामुळे एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला. नऊ जण या कारमध्ये बसले होते. दसऱ्यानिमित्त आयोजित बाबा राजपुरी जत्रेला ते जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार मुंदरी गावाजवळील कालव्यात पडली.
चालक थोडक्यात बचावला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र वाहनातील इतर आठ जण बुडाले आहेत. कोमल नावाची १२ वर्षांची मुलगी बेपत्ता असून तिचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सतविंदर (५०), चमेली (६५), तीजो (४५), फिजा (१६), वंदना (१०), रिया (१०) आणि रमणदीप (६) अशी मृतांची नावं आहेत. हे सर्व कैथलमधील डीग गावचे रहिवासी होते. घरातील सर्व सदस्य जत्रा पाहण्यासाठी जात होते.
कैथलमधील या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. ट्विटरवर पोस्ट करताना लिहिलं की, हरियाणातील कैथलमधील अपघात हृदयद्रावक आहे. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन घटनास्थळी सर्वतोपरी मदत करण्यात व्यस्त आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनीही याबाबत ट्विट केलं आहे.
डीग गावातून गुहणाच्या रविदास डेरा येथे दसरा पूजेसाठी जात असलेल्या एकाच कुटुंबातील आठ जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना हृदयद्रावक आहे. प्रभू श्री राम दिवंगत आत्म्यांना त्यांच्या चरणी स्थान देवो हीच प्रार्थना. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून सर्वतोपरी मदत उपलब्ध करून मदत कार्य वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.