कुजबूज (प्रसाद म्हांबरे)
By admin | Published: July 31, 2015 12:22 AM
सम की विषम..
सम की विषम..म्हापसा पालिकेच्या प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाले असले तरी पालिकेचे प्रभाग सम राहाणार की विषम याबाबत सस्पेन्स कायम आहे. मात्र, अधिकार्यांनी यावर तोडगा काढला असून सम व विषम अशी दोन्ही प्रकारची प्रभाग रचना करून आपले काम संपवले आहे. उद्या सरकार जो निर्णय घेईल तो घेईल, उगाच ऐनवेळी धावपळ नको, त्यामुळे अधिकार्यांनी आधीच तजवीज केली आहे. सरकारने पालिकेचे प्रभाग 15 वरून वाढवून 20 केले आहेत. त्यातही पुन्हा दुरुस्ती करण्याचा सरकारचा विचार असल्याने प्रभाग 21 होण्याची शक्यता आहे. प्रभाग 21 झाल्यास फेररचना करण्याचे कटकटीचे काम पुन्हा नव्याने करावे लागणार आहे. त्यामुळे अधिकार्यांनी प्रभाग रचना करताना 20 व 21 प्रभाग गृहीत धरून मतदार संख्या सम राहील याची काळजी घेतली आहे.--------------------------दाखवायचे व खायचे दात बेकार असलेल्या तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा व्यवसाय सुरू करावा, असे राज्य सरकार सत्तेवर आल्यापासून सांगत असले तरी काही गोष्टी या दुसर्यांना सांगण्यासाठीच असतात, याचा अनुभव हल्लीच म्हापशातील एका बेकार युवकाने घेतला. सरकारने व्यवसाय सुरू करणार्यांसाठी विविध योजना चालीस लावल्या आहेत. नोकरीसाठी वणवण भटकल्यानंतर म्हापशातील या युवकाने व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. बाजारपेठेत भाजीचे दुकान थाटण्याचे त्याने ठरवले. त्यासाठी बाजारात जागा कुठे मिळेल याची चाचपणी करू लागला. कोणीतरी त्याला येथे साकारत असलेल्या पालिकेच्या नव्या प्रकल्पाची माहिती दिली. त्यामुळे या प्रकल्पात आपल्याला जागा मिळावी यासाठी त्याने प्रयत्न चालवले. त्यासाठी त्याने तालुक्यातील ज्येष्ठ मंत्र्याचीही भेट घेतली व पालिकेच्या प्रकल्पात एखादी जागा द्यावी अशी विनवणी केली. मात्र या जेष्ठ मंत्र्याने त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी हा व्यवसाय तुला झेपणार नाही, असा सल्ला देतानाच हा व्यवसाय इतर राज्यातील लोकांसाठी योग्य असल्याचेही प्रमाणपत्र देऊन टाकले. बिचार्या त्या युवकाला, आपण परप्रांतीय असतो तर बरे झाले असते, असे वाटले असेल.