चेन्नई, दि. 30 - तामिळनाडूतल्या रामेश्वरम येथे भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ बनवलेल्या कलाम मेमोरियलमध्ये कलाम यांच्या पुतळ्याजवळ भगवद्गीता ठेवल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी 27 जुलै रोजी कलाम यांच्या दुस-या पुण्यतिथीनिमित्तानं कलाम मेमोरियलचं उद्घाटन केलं. त्यानंतर कलाम यांच्या जवळ ठेवलेल्या भगवद्गीतेवरून वाद उफाळून आला.कलाम यांच्या पुतळ्याच्या हातात वीणा देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या बाजूला भगवद्गीताही ठेवली होती. मात्र आता भगवद्गीतसोबतच कुराण आणि बायबलही कलाम यांच्या पुतळ्याशेजारी ठेवण्यात आलं आहे. डीएमकेसह अनेक राजकीय पक्षांनी वीणा वाजवणा-या कलाम यांच्या पुतळ्याजवळ भगवद्गीता ठेवल्यामुळे केंद्र सरकार आणि भाजपावर टीका केली होती. तसेच कलाम यांच्या कुटुंबीयांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली होती. कलाम यांच्या पुतळ्याजवळ सर्व धर्मांचे महान ग्रथ ठेवायला हवेत, अशी भावना कलाम यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली होती. त्याची तात्काळ दखल घेत भाजपा सरकारनं कलाम यांच्या पुतळ्याजवळ आता भगवद्गीतेसह बायबल आणि कुराणही ठेवलं आहे.डीएमकेचे नेते स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात या प्रकारावरून भाजपाला लक्ष्य केलं होतं. कलाम यांच्या पुतळ्याजवळ भगवद्गीता ठेवून भाजपानं सांप्रदायिकता पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. कलाम यांच्या पुतळ्याजवळ तमीळमधला महान ग्रंथ तिरुक्करल हासुद्धा नाही, असंही स्टॅलिन म्हणाले होते. वीसीकेचे नेते तिरुमवलन यांनीही भाजपावर निशाणा साधला आहे. कलाम यांच्या पुतळ्याजवळ भगवद्गीतेला जागा देऊन कलाम हे हिंदू धर्माचे महान पुरस्कर्ते असल्याच्या रूपात त्यांची ओळख करून देण्याची भाजपाची मनीषा तर नाही ना, यामुळे मुस्लिम धर्मीयांचा अपमान झाला आहे. त्यामुळे भगवद्गीता तात्काळ हटवा, अशी मागणीही तिरुमवलन यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. संरक्षण संशोधन विकास संस्थेने (डीआरडीओ) हे स्मारक उभारलं आहे.
गुरुवारी सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी रामेश्वरम येथे पोहोचले. ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी अब्दुल कलाम यांच्या एका पुतळ्याचं अनावरण केलं आणि आदरांजली वाहिली. स्मारकाच्या माध्यमातून अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास उलगडला गेला असून त्यांच्या आठवणीही जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला होता. १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर येथे एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. लोकांचे राष्ट्रपती अशी त्यांची ओळख होती. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना देशाचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखलं जायचं. त्यांचा जीवनप्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. डॉ. कलाम यांचं संपूर्ण आयुष्यच एक मोठा आदर्श आहे. २७ जुलै २०१५ रोजी आयआयएम- शिलॉंग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना कलाम यांचे निधन झाले.