नवी दिल्ली/ रामेश्वरम : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यावर गुरुवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार असून त्यांच्या रामेश्वरम या पैतृक गावी अंत्यदर्शनासाठी जनसागर उसळला आहे. डॉ. कलाम यांचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली आहे. त्यात शाळकरी मुले आणि महाविद्यालयीन युवकांपासून सर्व समाजघटकांचा समावेश आहे.शिलाँग येथे २७ जुलै रोजी डॉ. कलाम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत असताना त्यांचा जन्म आणि बालपण बघणारे रामेश्वरम हे छोटेसे गाव शोकसागरात बुडाले होते. बुधवारी तेथे दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. हजारो लोकांनी त्यांना अखेरचे बघता यावे यासाठी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. उन्हात अनेक लोक तासन्तास बसून असल्याचे दृश्य होते. गर्दीने हे गाव फुलून गेले.‘मिसाईल मॅन’ अशी उपाधी लाभलेल्या डॉ. कलाम यांचे पार्थिव बुधवारी संध्याकाळी ४ वाजता रामेश्वरमपासून १० कि.मी अंतरावर उभारण्यात आलेल्या खास हेलिपॅडवर उतरवण्यात आले. सुमारे १२ कि.मी. अंतरावरील पकाराम्बू येथे संपूर्ण लष्करी इतमामात दफनविधी पार पाडला जाईल. तत्पूर्वी पार्थिव दिल्लीहून मदुराई येथे नेण्यात आले होते. लष्कराच्या वाहनातून ते गावाच्या दिशेने रस्त्याने नेण्यात आले तेव्हा लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती. हेलिपॅडवर कलाम यांच्या कुटुंबातील काही सदस्य, तामिळनाडूचे वरिष्ठ मंत्री आणि द्रमुकचे नेते एम.के. स्टॅलिन उपस्थित होते. हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरवण्यात आल्यानंतर लोकांनी एकच गर्दी केली; मात्र सुरक्षा जवानांनी गर्दीवर नियंत्रण ठेवले. रात्री ८ वाजेपर्यंत लोकांना डॉ. कलाम यांचे अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर पार्थिव कुटुंबीयांकडे सोपविले जाईल, अशी माहिती नायडू यांनी दिली.तत्पूर्वी त्यांचे पार्थिव सकाळी ८.१५ वाजता दिल्लीच्या पालम विमानतळावरून विशेष विमानाने नेण्यात आले तेव्हा अनेकांनी साश्रू नयनांनी निरोप दिला. मोदी उपस्थित राहणारपंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रामेश्वरम येथे दफनविधीला उपस्थित राहणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी दिली आहे. भारताने रत्न गमावला आहे, असे मोदींनी आपल्या ब्लॉगवरून शोकसंवेदना देताना नमूद केले. तामिळनाडूमध्ये आज सुटीतामिळनाडू सरकारने गुरुवारी सुटी जाहीर केली असून उद्योगप्रतिष्ठानांनाही सुटीचा आदेश राज्याच्या श्रम मंत्रालयाने दिला आहे. कलाम यांच्या सन्मानार्थ राज्य सरकारने याआधीच सुटी जाहीर केली असून उद्योग प्रतिष्ठानांनीही सुटी द्यावी, असे श्रम आयुक्तांनी आदेशात म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कलाम यांच्यावर आज अंत्यसंस्कार
By admin | Published: July 30, 2015 4:10 AM