नवी दिल्ली : दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ अभियानाबाबत साशंक होते. ‘मेक इन इंडिया’ अभियान महत्त्वाकांक्षी आहे; पण त्यातून भारत स्वस्तात माल उत्पादित करण्याचा जगाचा कारखाना बनण्याचाच मोठा धोका आहे, असे कलामांना वाटत होते.कलाम यांचे निकटवर्तीय सृजप पाल यांनी लिहिलेल्या ‘अॅडव्हान्टेज इंडिया : फ्रॉम चॅलेंज टू अपॉर्च्युनिटी’ या पुस्तकात त्यांचे हे विचार मांडले आहेत. कलामांच्या या शेवटच्या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होत आहे. तत्पूर्वी, या पुस्तकातील काही भाग समोर आला आहे. ‘हॉर्पर कॉलिन्स इंडिया’ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात गत २७ जुलैला आयआयएम-शिलाँग येथे कलाम यांच्या अर्धवट राहिलेल्या भाषणाचाही समावेश आहे. आयआयएम-शिलाँग येथे भाषण सुरूअसतानाच कलाम मंचावर कोसळले होते. यानंतर काहीच वेळात त्यांचे निधन झाल्याची बातमी आली होती. रालोआ सरकारने गतवर्षी सप्टेंबरमध्ये ‘मेक इन इंडिया’चा शुभारंभ केला होता. भारतात गुंतवणुकीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण स्थान तसेच उत्पादन, डिझाईन व नवकौशल्याचे एक जागतिक केंद्र बनविणे ‘मेक इन इंडिया’चा हेतू आहे. तथापि, कलामांच्या मनात या अभियानाबाबत साशंकता होती. ‘मेक इन इंडिया’ महत्त्वाकांक्षी आहे. मात्र, भारताला आणखी मोठ्या महत्त्वाकांक्षा बाळगण्याची गरज आहे. ‘मेक इन इंडिया’सारख्या मोहिमेची देशाला गरज आहेच; पण यामुळे भारत जगासाठी केवळ एक स्वस्त उत्पादन केंद्र बनून राहण्याचा धोका आहे. या विकासाच्या मोबदल्यात देशातील जनतेला मोठी किंमत चुकवावी लागू शकते, असे मत कलाम यांनी मांडले आहे.भारतातील विकासात विसंगती आहे. आज दूरसंचार आणि टेलिकॉम क्षेत्राने नेत्रदीपक प्रगती केली आहे. मात्र, अजूनही अनेक गावांपर्यंत वीज व रस्ते पोहोचलेले नाहीत. अशा स्थितीत पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही कलामांनी म्हटले आहे. ‘अग्नी’बाबत काय प्रगती आहे, असे पलीकडून बोलणाऱ्या शेषन यांनी मला विचारले आणि माझ्या उत्तराची प्रतीक्षा न करताच, प्रक्षेपणाच्या विलंबासाठी अमेरिका व नाटोकडून प्रचंड दबाव असल्याचे मला सांगितले. यानंतर पुन्हा ‘अग्नी’बाबत काय प्रगती आहे, असे त्यांनी मला विचारले. त्याक्षणी त्या प्रश्नाचे उत्तर देणे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते; पण आता याक्षणी मागे फिरता येणार नाही, असे विचारपूर्वक उत्तर मी दिले. यावर पलीकडून माझ्यावर प्रश्नांचा भडिमार होईल, असे मला वाटले. मात्र, शेषन यांनी एक दीर्घ श्वास घेत, ‘आगे बढ़िए’ असे सांगितले.यानंतर तीन तासांनी २२ मे १९८९ रोजी ‘अग्नी’चे यशस्वी प्रक्षेपण झाले, असे कलाम यांनी यात लिहिले आहे.
‘मेक इन इंडिया’बाबत कलामांनी केले होते सावध
By admin | Published: October 18, 2015 10:18 PM