- अनुप देवधर
24 जानेवारी 2019...
भारतात काल एक ऐतिहासिक घटना घडली. भारताने काल एकाचवेळी दोन उपग्रह 'लाँच' केले. रात्री ठीक 11:37 ला श्रीहरिकोटाच्या डॉ. सतीश धवन स्पेस सेंटर इथून इस्रोने एक PSLV C-44 (Polar Satellite Launch Vehicle) मधून दोन उपग्रह पाठवले. या उपग्रहांपैकी एक म्हणजे DRDO ने बनवलेला Microsat-R हा सैन्याच्या उपयोगाचा महत्त्वाचा उपग्रह आहे.
पण विशेष आहे तो दुसरा. 'कलामसॅट'
देशाचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ दिवंगत डॉ. APJ अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ या उपग्रहाला त्यांचं नाव दिलं गेलं आहे. पण खास गोष्ट अशी की, 'कलामसॅट' हा उपग्रह तामिळनाडूच्या पल्लापट्टी गावातल्या सहा 18 वर्षीय मुलांच्या टीमने बनवलेला आहे. या सहा जणांच्या टीमचा कॅप्टन आहे, रिफात शारुख.
अमेरिकेच्या NASA आणि I Doodle Learning ह्या दोन संस्थांकडून Cubes in Space नावाची एक स्पर्धा भरवण्यात अली होती. त्यात रिफात शारुखच्या टीमने भाग घेतला होता. चेन्नईच्या Space Kidz India या संस्थेने रिफातच्या टीमला आर्थिक मदत केली आणि त्यानंतर या मुलांनी चमत्कार केला.
रिफात आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 3-D प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीने चक्क सगळ्यात कमी वजनाचा, म्हणजे फक्त 64 ग्रॅमचा उपग्रह बनवला आणि त्याला डॉ. कलामांचं नाव देऊन भारताची मान जगात उंचावली.
ह्या उपग्रहाचा आकार बघूनही कोणीही थक्क होईल. फक्त 3.8 सेंमीचा cube, म्हणजे लहान आकाराचा Rubik Cube एवढाच. कार्बन फायबर पॉलिमर पासून बनवलेल्या या उपग्रहाचं अवकाशातलं आयुष्य 240 मिनिटांचं असणार आहे. पण भारतीय तरुणांचा 'पराक्रम' सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलाय, तो कायमचा.
काल सोडलेला 'कलामसॅट' हा थोडा अपडेटेड आहे. 1.2 किलो वजनाचा आणि 10 सेंमी घन आकाराचा हा उपग्रह. 740 किलो वजन घेऊन 274 किलोमीटर वर सूर्याच्या कक्षेत Microsat-R तर त्यानंतर सुमारे 90 मिनिटांनी अजून वरच्या कक्षेत छोटा 'कलामसॅट' स्थिरावेल.
कोण आहेत हा उपग्रह बनवणारी मुलं?
कोणत्या भारतात राहतात ही?
भ्रष्टाचार, बेरोजगारी, गरिबी, दहशतवाद, जातीयवाद, दंगली ह्या सगळ्यांमुळं यांच्यावर नैराश्य नाही का आलं?
एकीकडे 'इंडिया'मधली मुलं दिवसभर PUBG आणि तत्सम गेम खेळण्यात बिझी असताना, आपला देश कसा वाईट्ट आहे यावर चर्वितचर्वण करत असताना, सोशल मीडियावर क्रांती घडवण्याच्या गप्पा मारत असताना 'भारता'तील सामान्य गरीब कुटुंबातील मुलांनी जगात कुणालाही न जमलेली किमया करून दाखवली, हा केवढा विरोधाभास!
18 वर्षांची अकरावी-बारावीतली ही मुलं, हाच या नव्या भारताचा शोध आहे.