चेन्नई : आपण भगवान विष्णूचे अवतार आहोत, असे जाहीर करून, अनेक आश्रम उघडलेल्या ७0 वर्षे वयाच्या भगवान कल्की बाबाकडे प्राप्तिकर खात्याला ५00 कोटींची मालमत्ता सापडली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू व तेलंगणात ४0 ठिकाणी छापे घालून प्राप्तिकर खात्याने ही मालमत्ता ताब्यात घेतली आहे.
बाबाच्या आश्रमात २६ कोटी रुपये किमतीचे ८८ किलो सोने आणि १८ कोटी रुपये मूल्याचे अमेरिकन डॉलर्सही सापडले. याशिवाय पाच कोटी रुपये किमतीचे हिरेही आढळले. त्याची विद्यापीठ व आध्यात्मिक शाळाही आहे. आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्याच्या वैरादेहपलयममध्ये त्याचा मुख्य आश्रम आहे. त्याच्या बंगळुरूच्या आश्रमात ९३ कोटींची रोकड सापडली. अन्य ठिकाणच्या छाप्यांत ४0९ कोटी रुपयांची मालमत्ता सापडली. त्याने जमिनी हडप केल्या आणि मोठ्या प्रमाणात करचुकवेगिरीही केली आहे. त्याच्या संस्थांनी चीन, अमेरिका व सिंगापूरमधील काही कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.
एलआयसीमध्ये होता कारकून
हा बाबा एके काळी एलआयसीमध्ये कारकून म्हणून नोकरी करीत होता. त्याने १९८0 साली आपण भगवाने विष्णूचे दहावे अवतार असल्याचे स्वत:च घोषित केले. त्यानंतर, आंध्र प्रदेशात त्याने पहिला आश्रम सुरू केला. पुढे या बाबाने जीवाश्रम ही आध्यात्मिक शाळा सुरू केली आणि नंतर मुलगा कृष्णा याच्या मदतीने वननेस युनिव्हर्सिटी नावाचे विद्यापीठ सुरू केले. त्याच्या भक्तांमध्ये अनेक विदेशी लोकही आहेत. ठिकठिकाणाहून आलेल्या देणग्याच्या पावत्या द्यायच्या नाहीत आणि त्या रोख रकमा परस्पर अन्यत्र वळवायच्या वा गुंतवायच्या असा प्रकार गेली अनेक वर्षे सुरू होता.