रांची : कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज रांची येथे ईडी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, सोमवारी ईडीचे पथक दिल्लीत दिवसभर त्यांचा शोध घेत होते, मात्र हेमंत सोरेनचा यांचा शोध लागला नाही. यानंतर मंगळवारी हेमंत सोरेन हे अतिशय नाट्यमय पद्धतीने रांचीला पोहोचले आणि तिथे त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या (झामुमो) आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कल्पना सोरेनही उपस्थित होत्या.
दरम्यान, ईडीने जवळपास 10 वेळा समन्स बजावलेले मुख्यमंत्री हेमंत सोरेन अद्याप चौकशीसाठी हजर झाले नाहीत. ईडीच्या तपासामुळे झारखंडमध्ये राजकीय पेच निर्माण झाला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) काही आमदार रांचीच्या सर्किट हाऊसमध्ये थांबले आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्रीपदासाठी कल्पना सोरेन यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे कल्पना सोरेन यांची एकूण संपत्ती आणि शिक्षण याबद्दल जाणून घेऊया...
कल्पना सोरेन यांचे शिक्षण आणि एकूण संपत्तीइंटरनेटवर मिळालेल्या माहितीनुसार, 43 वर्षीय कल्पना सोरेन यांनी इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी तसेच एमबीए केले आहे. निवडणूक आयोगाला 2019 मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार, हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे जवळपास 5 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे 8,51,74,195 रुपयांची संपत्ती आहे.
यापूर्वी 'त्या' राजकारणात सक्रिय नव्हत्याकल्पना सोरेन या ओडिशातील मयूरभंज येथील आहेत. 7 फेब्रुवारी 2006 रोजी त्यांचे हेमंत सोरेन यांच्यासोबत लग्न झाले. त्यांना निखिल आणि अंश ही दोन मुले आहेत. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्या सतत आवाज उठवत असतात. यापूर्वी त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या. दरम्यान, कल्पना सोरेन सेंद्रिय शेतीशी संबंधित असून त्यांची शाळा आहे. त्यांच्या नावावर तीन व्यावसायिक इमारतीही आहेत.