सुलतानपूर : कल्याण येथून धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या बसला सोमवारी पहाटे उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात ३८ जण जखमी झाले असून नऊ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसला धडक देणाऱ्या ट्रकचा ड्रायव्हर पळून गेला आहे. हा ट्रक जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.मध्य आणि उत्तर प्रदेशातील काही धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी कल्याण येथून १५ दिवसांपूर्वी ५० भाविकांची बस रवाना झाली. उज्जैन येथील मंदिरांना व मध्य प्रदेशातील इतर ठिकाणांना भेट दिल्यानंतर हे यात्रेकरू उत्तर प्रदेशात आले होते. तिथे अयोध्येत दर्शन घेतल्यानंतर ते काशीकडे निघाले होते.
सोमवारी पहाटे ड्रायव्हरने सुलतानपूर जिल्ह्यातील लंबुआ नगरपंचायतीच्या हद्दीत एका चहाच्या दुकानाजवळ बस उभी केली. ड्रायव्हर चहा घेण्यासाठी तिथे गेले. त्याचवेळी सफरचंदांनी भरलेला एका ट्रकने या बसला धडक दिली. त्यात ३८ जण जखमी झाले. जखमींमध्ये महिलांचा समावेश आहे. जखमींमध्ये अनेक महिलांचा समावेश आहे. किरकोळ जखमी झालेल्यांवर सुलतानपूर येथील आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.