सचिन जवळकोटे
गुवाहटी - देशात गाजलेल्या महाराष्ट्रातील राजकीय बंडाचं केंद्रस्थान असलेल्या गुवाहटीतील कामाख्या देवीचं मंदिर महाराष्ट्राची राजधानी मुंबईत होणार आहे. तर, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची उजळणी करणाऱ्या जाणता राजा ह्या लोकप्रिय महानाट्याचे प्रयोग संपूर्ण आसाम राज्यात होणार असल्याची माहिती आसामचेमुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी दिली. महाराष्ट्रातील पत्रकारांचे शिष्टमंडळ सध्या आसाम दौऱ्यावर असून त्यांनी मुख्यमंत्री शर्मा यांची भेट घेतली. यावेळी, शर्मा यांनी महाराष्ट्र व आसाम राज्यातील सलोख्याच्या संबंधांवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या चर्चेचा वृत्तांतही सांगितला.
महाराष्ट्रातील राजकीय बंडात आसाममधील निसर्ग सौंदर्याचं कथन करणारा, काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... हा डायलॉग महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला होता. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ह्या डायलॉगमुळे गुवाहटीचं सौंदर्य महाराष्ट्रात आणखीनच खुललं होतं. तर, राजकीय बंड यशस्वी झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी येथील प्रसिद्ध कामाख्या देवीचं दर्शनही घेतलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही दर्शनासाठी आले होते. त्यावेळी, मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यावेळी, दोन्ही राज्यातील अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली होती. त्याची, आठवण मुख्यमंत्री शर्मा यांनी सांगितली.
महाराष्ट्रसह देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कामाख्या देवीचं मंदिर आता मुंबईत होणार आहे. तर, छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या जाणता राजा या महानाट्याचे प्रयोग आसाममधील प्रत्येक जिल्ह्यात होणार असल्याचं हेमंत शर्मा यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांचा आदर्श घेत आसाममधील लोकांनी मुघल शाहीला आसाममध्ये पाऊल ठेऊ दिलं नाही. त्याच प्रेरणेतून येथील गावागावात जाणता राजा नाटकाचे प्रयोग होणार आहेत.
तसेच, महाराष्ट्रात आसाममधील हजारो नागरिक पोटा-पाण्यासाठी राहतात, ते महाराष्ट्रावर खूप प्रेम करतात. तसेच, आसाममध्येही मराठी माणूस राहत असून येथील महाराष्ट्र मंडळाने गुवाहटीत महाराष्ट्र भवन उभारण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीसही दोन्ही राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्याचेही शर्मा यांनी म्हटले. त्यामुळे, लवकरच दोन्ही राज्याची संस्कृती, परंपरा आणि राजकीय सलोखा राखण्याची अनेक महत्त्वपूर्ण कामे पूर्णत्त्वास येतील, असे दिसून येत आहे.