ओडिशात पुन्हा एकदा रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. याठिकाणी बंगळुरू-आसाम या मार्गावरील कामाख्या एक्सप्रेसचे ११ डबे रूळावरून घसरले आहेत. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. ही ट्रेन चौद्वार परिसरातील मंगुली पेसेंजर हॉल्टजवळ रुळावरून घसरली. सध्या रेल्वेने याठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनसाठी एनडीआरएफ आणि मेडिकल पथके पाठवली आहेत.
ओडिशाच्या कटकमधील चौद्वारजवळ बंगळुरू-कामाख्या सुपरफास्ट एक्सप्रेस रूळावरून खाली घसरली. या ट्रेनचे ११ डबे घसरल्याने नीललाच एक्सप्रेस, धौली एक्सप्रेस, पुरूलिया एक्सप्रेसचा मार्ग बदलण्यात आला आहे. घटनास्थळावर बचाव कार्य आणि प्रशासन हजर आहे. मेडिकल टीम, एनडीआरएफसोबतच अग्निशमन दलाचे कर्मचारीही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी आहेत. याठिकाणी अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित त्यांच्या ठिकाणांवर पोहचवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.
रेल्वे अधिकारी काय म्हणाले?
ईस्ट कोस्ट रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अशोक कुमार मिश्रा म्हणाले की, आम्हाला कामाख्या एक्सप्रेसचे काही डबे रूळावरून घसरल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने तिथे बचाव पथके पाठवण्यात आली आहे. या दुर्घटनेत कुणीही जखमी असल्याची माहिती नाही. सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. याठिकाणी रेस्क्यू ट्रेन, आपत्कालीन आरोग्य सुविधा पाठवण्यात आली आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहचत आहेत. या दुर्घटनेच्या तपासानंतर हे कसं घडलं हे समोर येईल. आमचं पहिलं प्राधान्य या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत करणे आणि प्रवाशांना सुखरूप त्यांच्या ठिकाणावर पोहचवणं हे आहे असं रेल्वेने सांगितले. दरम्यान, ओडिशातील रेल्वे दुर्घटनेची मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनीही माहिती घेतली आहे. ओडिशात १२५५१ कामाख्या एक्सप्रेसचा अपघात झाल्यानंतर आम्ही ओडिशाचे मुख्यमंत्री, तिथलं सरकार आणि रेल्वेच्या संपर्कात आहोत असं त्यांनी म्हटलं.