चेन्नई : तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी मे महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी सुपरस्टार रजनीकांत यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे हे दोन दिग्गज एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.रजनीकांत हे पुढील वर्षी राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. कमल हासन यांनी त्यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. रजनीकांत यांच्या पक्षाची विचारधारा जुळल्यास युती करण्यास हसन यांची तयारी आहे. ते म्हणाले, की, माझ्याप्रमाणेच तेदेखील बदलासाठी लढत आहेत. रजनीकांत यांनी पक्षाबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. आम्ही फक्त एका फोनकॉलच्या अंतरावर आहोत. एकत्र काम करणे शक्य असल्यास आम्ही त्याबाबत निश्चितच विचार करू. परंतु, या दोन अभिनेत्यांनी एकत्र येण्याचा विचार रजनीकांत यांच्या चाहत्यांना रुचलेला नाही. रजनीकांत फॅन असोसिएशनने यास विरोध केला आहे.
भाजपला फायदा होण्याची शक्यताकमल हसन यांनी ‘मक्कल नीधी मैयम’ नावाने पक्ष स्थापन केला आहे. लोकसभेत पक्षाला ३.७७ टक्के मते मिळाली होती. ते सध्या निवडणुकीत एकटेच लढणार आहेत. त्यामुळे त्यांना भाजपची ‘बी’ टीम असल्याचे बोलले जात आहे. हसन हे ‘डीएमके’ आणि ‘एआयएडीएमके’ या पक्षांची मते ओढू शकतात. परिणामी भाजपलाच फायदा होण्याची शक्यता जास्त आहे.