नवी दिल्ली - थलायवा रजनीकांत यांच्या पाठोपाठ आता अभिनेते कमल हसनदेखील राजकारणात प्रवेश करत आहेत. 21 फेब्रुवारीला कमल हसन आपल्या पक्षाच्या नावाची घोषणा करणार आहेत. शिवाय, कमल हसन याच दिवशी आपले मूळगाव रामनाथापुरम येथून राज्यव्यापी दौरादेखील करणार आहे. या दौ-यादरम्यानच आपल्या राजकीय पक्षाची आणि मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा ते करणार आहेत.
कमल हसन यांचा राज्यव्यापी दौरा
नोव्हेंबर 2017 मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेतही अभिनेते कमल हसन यांनी राजकीय पक्ष स्थापनेची अधिकृत घोषणा करायच्या आधी तामिळनाडूचा दौरा करणार असल्याचं सांगितले होते. ''चांगला तामिळनाडू हे माझे स्वप्न आहे. पक्ष स्थापन करायच्या आधी त्याचा पाया बळकट करणे महत्त्वाचे आहे. पक्षाचे नाव जाहीर करायची ना गरज आहे ना घाई'', असेही कमल हसन म्हणाले होते. शिवाय, हसन यांनी ‘#मेयम व्हीसल’ हे भ्रष्टाचारविरोधी मोबाइल अॅप सुरू केल्याचीही माहिती यावेळी दिली होती. हे अॅप व्यासपीठापेक्षा अधिक काही आहे, असेही ते म्हणाले होते. दरम्यान, ''सत्ता उपभोगावी या लालसेने किंवा उत्सुकतेतून मी हे प्रयत्न करीत नाही. एखादी दुर्घटना घडण्याची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. आपण एकत्र येऊ न मोठे संकट टाळू शकतो'', असेही यावेळी ते म्हणाले होते.