- हरिश गुप्ता नवी दिल्ली : तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केलेले प्रख्यात अभिनेते कमल हासन यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी बुधवारी चर्चा केल्यानंतर ते गुरुवारी यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनाही भेटले. कमल हासन व राहुल गांधी यांची काल चर्चा सुरू असतानाच प्रियांका गांधी-वड्रा याही तिथे पोहोचल्या आणि त्याही काही काळ चर्चेत सहभागी झाल्या होत्या. यामुळे कमल हासन व काँग्रेस तामिळनाडूमध्ये एकत्र येण्याच्या चर्चेचा उधाण आले आहे.प्रियांका यांच्याच सल्ल्यामुळे कमल हासन यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचे समजते. प्रियांका गांधी प्रत्यक्ष राजकारणात नसल्या तरी त्या अलीकडे बऱ्याच सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. आपले बंधू राहुल व आई सोनिया गांधी यांना त्या मदत करतात, असे सांगण्यात आले. भाजपातून बाहेर पडलेले क्रिकेटपटू नवज्योत सिद्धू यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह अन्य नेत्यांचे मन वळविण्याचे काम प्रियांका गांधी यांनीच केले होते.कमल हासन सलग दोन दिवस दिल्लीत गांधी कुटुंबातील नेत्यांना भेटल्यामुळे राजधानीत उधाण येणे स्वाभाविकच होते. ही भेट गुप्त होती. मात्र, नंतर राहुल यांनी कमल हासन यांच्यासोबतचे छायाचित्र टिष्ट्वट केले.कमल हासन यांनीही आपण राहुल यांना भेटल्याचे मान्य केले. त्या दोघांमध्ये तामिळनाडूच्या राजकारणावर चर्चा झाली. राहुल व हासन जवळपास एक तास एकत्र होते. तुम्ही तामिळनाडूमध्ये काँग्रेसशी आघाडी वा समझोता करणार का, असे विचारता, या विषयावर आमची अजिबात चर्चा झाली नाही, असे ते म्हणाले. जयललिता यांच्या निधनानंतरच्या राज्यातील परिस्थितीची माहिती कमल हासन यांनी राहुल गांधी यांना दिली.तामिळनाडूमध्ये करुणानिधी यांचा द्रमुक पक्ष काँग्रेससोबत आहे. राहुल गांधी यांनी करुणानिधी व त्यांचे पुत्र व पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतली होती. राजकारण प्रवेशाची घोषणा केल्यानंतर कमल हासन हेही करुणानिधी यांच्या भेटीला गेले होते. त्यामुळे काँग्रेस-द्रमुक-कमल हासन हे येत्या निवडणुकांत एकत्र येतील, असे बोलले जात आहे.>रजनी विरुद्ध कमल?तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांनीही राजकारणात प्रवेशाची घोषणा केलीच आहे. ते आध्यात्मिक राजकारणाची भाषा करीत असून, भाजपाचे नेते त्यांना वारंवार भेटत आहेत. त्यामुळे ते भाजपाला मदत करतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. याउलट कमल हासन हे डाव्या विचारांची पाठराखण करीत असल्याचे आतापर्यंत दिसले आहे. रजनीकांतयांच्याशी समझोता होण्याची शक्यता नसल्याचे संकेत त्यांनी आधीचदिले होते. त्यामुळे येत्या निवडणुकांत रजनी विरुद्धकमल हासन असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कमल हासन यांची दिल्लीत राहुल, सोनिया गांधींशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 4:22 AM