चेन्नई : आपण राजकारण प्रवेशाबाबत गंभीर असल्याचे संकेत दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांच्या हालचालींतून मिळत आहेत, तसेच ते राष्ट्रीय पातळीवर आपले नेटवर्क उभे करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे संकेतही आहेत. शुक्रवारी कोलकाता दौ-यात त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. त्यातून त्यांचे इरादे अधिक स्पष्ट झाले.कमल हासन हे २३व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त कोलकात्याला गेले होते; हीच संधी साधून त्यांनी ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली. कमल हासन यांनी भेट घेतलेल्या त्या तिस-या बिगर-भाजपा आणि बिगर-काँग्रेस मुख्यमंत्री आहेत. याआधी १ सप्टेंबर रोजी त्यांनी थिरुवनंतपुरमला जाऊन केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भोजनाचे निमंत्रण देऊन चेन्नईला बोलावून घेतले होते. नंतर दोघे एकत्रितरीत्या पत्रकारांनाही सामोरे गेले होते. भेटीचा उद्देश आणि अजेंडा याबाबत दोघांनीही मौन बाळगले होते. तिन्ही मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर कमल हासन यांच्या राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. (वृत्तसंस्था)रंग भगवा नाहीविजयन आणि केजरीवाल यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर कमल हासन यांनी घेतलेली ममता बॅनर्जी यांची भेट महत्त्वाची ठरते. विजयन यांच्या भेटीनंतर ‘आपला रंग भगवा नसल्या’चे वक्तव्य कमल हासन यांनी केले होते. त्यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते एल. गणेशन यांनी कमल हासन यांचा रंग लाल असून, ते डाव्यांसोबत प्रवास करीत आहेत, असे म्हटले होते.
कमल हासन राष्ट्रीय राजकारणामध्ये? ममता बॅनर्जींसह दोन मुख्यमंत्र्यांना भेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 6:12 AM