मेरठ - लवकरच राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीत असलेल्या अभिनेता कमल हासन आणि त्यांच्यासारख्या लोकांची गोळ्या घालून हत्या केली पाहिजे असं अखिल भारतीय हिंदू महासभेने म्हटलं आहे. कमल हासन यांनी हिंदू दहशतवादावर केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभुमीवर हिंदू महासभेने ही प्रतिक्रिया दिली आहे. 'उजव्या विचारसरणीच्या लोकांनी बळाचा वापर करायला सुरुवात केली आहे. हे लोक हिंसाचारात सहभागी असून हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद घुसला आहे', असा आरोप कमल हासन यांनी त्यांच्या लेखातून केला होता.
'कमल हासन आणि त्यांच्यासारख्यांना धडा शिकवण्यासाठी एकतर गोळ्या घालून हत्या केली पाहिजे, किंवा फासावर लटकवलं पाहिजे. हिंदू धर्मासाठी अपमानास्पद भाषा वापरणा-यांना जगण्याचा कोणताच हक्क नाही. असं अपमान कोणी करत असेल तर त्याला जगण्याचा अधिकार नाही', असं अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक शर्मा बोलले आहेत.
हिंदू महासभेच्या दुस-या एका नेत्याने कमल हासन यांच्या सर्व चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. 'आमच्या सर्व सदस्यांनी कमल हासन आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित सर्व चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची शपथ घेतली आहे. सर्व भारतीयांनीही हा निर्णय घेतला पाहिजे. हिंदूंचा आणि धर्माचा अपमान करणा-यांना माफ करता कामा नये', असं मेरठचे अध्यक्ष अभिषेक अग्रवाल बोलले आहेत.
कमल हासन यांनी नेमकं काय लिहिलं आहे लेखात -हिंदू दहशतवादावर भाष्य करणारा लेख लिहून कमल हासन यांनी खळबळ उडवून दिली आहे. 'उजव्या विचारसरणीच्या लोकांनी बळाचा वापर करायला सुरुवात केली आहे. हे लोक हिंसाचारात सहभागी असून हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद घुसला आहे', असा आरोप कमल हासन यांनी त्यांच्या लेखातून केला आहे. 'हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही, असं कोणीच म्हणणार नाही. यापूर्वी हिंदुत्ववादी चर्चा करण्यावर विश्वास ठेवायचे. पण आता ते हिंसाचारातही सहभागी होऊ लागले आहेत', असं कमल हासन यांनी म्हंटलं आहे. तसंच जनतेचा 'सत्यमेव जयते'वरील विश्वास उडाला आहे, असंही त्यांनी लेखात म्हंटलं आहे. 'तामिळनाडूच्या तुलनेत केरळ सरकारने धार्मिक हिंसाचार चांगल्या पद्धतीनं हाताळला आहे', असं म्हणत कमल हासन त्यांनी केरळ सरकारचं कौतुकही केलं.
कमल हासन मानसिकदृष्टया अस्थिर, उपचारांची गरज- भाजपानं केली टीकाकमल हासन यांचे विधान भाजपा नेत्यांच्या जिव्हारी लागले. त्यांनी अत्यंत बोच-या शब्दात कमल हासन यांच्यावर टीका केली. कमल हासन यांची मनोवस्था ठीक नसून, ते मानसिक दृष्टया अस्थिर झाले आहेत अशा शब्दात भाजपा नेत्यांनी कमल हासन यांच्यावर हल्लाबोल केला. कमल हासन यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली पाहिजे. त्यांची मनोवस्था ठीक नसून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्याची गरज आहे असे भाजपा नेते विनय कटियार म्हणाले. अशा प्रकारचे एखाद्याची बदनामी करणारे राजकारण करणे अजिबात योग्य नाही. त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाहीय असे कटियार यांनी सांगितले.